पुणे: पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. पोलिसांनी कडक (Pune Police) सुरक्षा व्यवस्था तैनात करून देखील चोरड्यांनी नागरिकांच्या वस्तुवर डल्ला मारल्याचं दिसून येतंय. विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी ३०० नागरिकांचे मोबाइल चोरून नेल्याची माहिती आहे. याप्रकरणी मध्यभागातील फरासखाना, विश्रामबाग, खडक, समर्थसह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.


सर्वाधिक मोबाइल चोरीच्या घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. मुख्य मिरवणूक मार्गावर चोरट्यांनी ९१ मोबाइल चोरले आहेत. फरासखाना पोलिसांनी मध्यप्रदेश आणि नाशिक येथील मोबाईल चोरांच्या टोळीतील दोघांना पकडून दोन लाख ७९ हजाराचे २१ मोबाइल जप्त केले आहेत. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी मोठी गर्दी झाली होती.सर्वाधिक गर्दी लक्ष्मी रस्त्यावर झाली होती. बेलबाग चौक ते लोकमान्य टिळक चौकात मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. 


गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवसामध्ये शहराच्या मध्यभागातून २५ मोबाइल चोरीच्या घटना घडल्याची नोंद पोलिसांनी केली. मात्र, विसर्जन मिरवणुकीत सर्वाधिक मोबाइल चोरीच्या घटना घडल्याचं दिसून आलं आहे. मोबाइल, तसेच दागिने चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पथके तैनात केली होती, तसेच ध्वनीवर्धकावरुन पोलिसांनी मोबाइल, दागिने चोरांपासून सावध रहा, आपल्या मौल्यवान वस्तु, लहान मुले यांना सांभाळा असे आवाहन केले होते.


मोबाइल चोरणाऱ्या महिलांची टोळी गजाआड


गणेशोत्सव काळात अनेक चोरट्यांनी महागडे मोबाइल चोरल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मोबाइल चोरीला गेल्याची तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे दिल्या आहेत. फरासखाना पोलिसांनी एका महिलांच्या टाेळीला अटक केली आहे. तपासात महिलांनी नवी मुंबईत दागिने चोरल्याची माहिती देखील समोर आली आहे. गीता वेंकटेश खट्टी (वय २०), पूजा प्रविण गाझु (२४, दोघी रा. पाथर्डी, नाशिक) यांना पोलिसांनी चोरी प्रकरणात अटक केली.