पुणे: पुण्यातील अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) कंपनीच्या ऑफीसमध्ये काम करणारी २६ वर्षीय सीए अॅना सेबॅस्टियन पिरेयिल हिचा अतिकामामुळे आणितणावामुळे बळी गेल्याचा आरोप होत आहे. नोकरीला लागल्यानंतर अवघ्या चार महिन्यात तिला मृत्यूने गाठलं ती कामावर रूजू झाल्यापासून प्रंचड तणावाखाली असायची आणि तिच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांनी कंपनीच्या भारतीय प्रमुखांना पत्र लिहित गंभीर आरोप केले आहेत. या घटनेनंतर मोदी सरकारने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तर या घटनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेबाबाबत भावना केली व्यक्त केली आहे.
काय म्हणालेत अजित पवार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबाबाबत भावना करताना म्हटलं, ‘पुण्यातील ईवाय कंपनीमधील २६ वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूबद्दल ऐकून खूप दुःख झाले. कामाच्या तणावामुळे तरुणांच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मला आशा आहे की, ईवाय कंपनी सुधारात्मक पावले उचलेल,'अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
बिग ४ अकाउंट फर्मच्या EY कंपनीच्या पुण्याच्या शाखेत अॅना सेबेस्टियन पिरेयिल नावाची तरूणी काम करत होती. तिचा मृत्यू झाला आहे. एना ही केरळची होती. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आईने भारतातील कंपनीचे प्रमुख राजीव मेमानी यांना पत्र लिहिल आहे. आपल्या लेकीने कंपनी जॉइन केल्यापासून ती नेहमीच कामाच्या तणावाखाली रहायची. एनाने मार्च २०२४ मध्ये कंपनी जॉइन केली होती. तिचा मृत्यू 20 जुलै रोजी झाला होता. अॅनाच्या आई अनिता सेबॅस्टियन यांनी कंपनीवर गंभीर आरोप केल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.
केंद्रीय कामगार विभागाने देखील घेतली दखल
अॅना सेबॅस्टियन पेरायलच्या मृत्यूमुळे दुःख झाले. असुरक्षित आणि शोषण होणाऱ्या वातावरणात काम करावे लागत असल्याच्या आरोपांची सखोल चौकशी सुरु आहे. आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहोत. कामगार मंत्रालयाने या प्रकरणी अधिकृतपणे तक्रार नोंदवून घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय कामगार विभागाच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली आहे.
अॅनाच्या आईने पत्रात काय लिहलं आहे?
पहिलीच नोकरी असल्यामुळे अॅना खुप मेहनतीने आणि झोकून देऊन काम करायची. कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ती काळ वेळ न पाहता काम करायची. मात्र, याचा परिणाम शारीरिक, मानसिक आरोग्यावर झाला. कंपनीत जॉइन झाल्यानंतर काही दिवसातच तिला अस्वस्थपणा जाणवू लागला, झोप न येणं, तणावासारख्या समस्या तिला सुरू झाल्या. तरीही ती काम करत होती. तिला वाटायचं की खूप कष्ट, सतत काम करत राहणं हाच यश मिळवण्याचा मार्ग आहे. एनाच्या आईने असाही दावा केला की, कामाच्या ताणामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. तिचा मॅनेजर क्रिकेट सामन्यावेळी अनेकदा मिटिंगच्या वेळा बदलायचा आणि दिवस संपताना काम द्यायचा. यामुळे ताण वाढायचा, असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
आईच्या पत्रावर EY कंपनीचे स्टेटमेंट
अॅना सेबॅस्टियनचे दुःखद आणि अकाली निधन झाल्यामुळे आम्हाला अत्यंत खेद होत आहे. अॅना सेबॅस्टियनच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अॅना १८ मार्च २०२४ रोजी पुण्यातील ईवाय ग्लोबलची फर्म एस आर बाटलीबोई येथे ऑडिट टीममध्ये रुजू झाली होती. तिची कारकीर्द अशाप्रकारे संपल्याने आम्हा सर्वांचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे, असं कंपनीने निवेदन जारी करत म्हटलं आहे.
तर अॅनाच्या कुटुंबाने अनुभवलेल्या नुकसानाची भरपाई कोणत्याही प्रकारे केली जाऊ शकत नसली तरी, अशा वेळी आम्ही नेहमीप्रमाणे सर्व मदत केली आणि यापुढेही करत राहू. आम्ही कुटुंबाचा पत्रव्यवहार अत्यंत गांभीर्याने घेत आहोत. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या कल्याणाला महत्त्व देतो. भारतात असलेल्या ईवाय सदस्य संस्थांमधील आमच्या एक लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कार्यालयात आनंददायी वातावरण देण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही कंपनीने आपल्या निवेदनात दिली आहे.