पिंपरी : मराठी शाळांसाठी सवलतीच्या दरात भूखंड घेऊन त्याजागी इंग्रजी शाळा बांधल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. आरक्षित भूखंड लाटणाऱ्या अशा चार शिक्षण सम्राटांना पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणानं नोटीस पाठवली आहे. भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी याप्रकरणी प्राधिकरणाकडे तक्रार केली होती.
प्राधिकरणानं या तक्रारीला उत्तर देताना अभिषेक विद्यालय, ईश्वरदास बहेल चॅरिटेबल ट्रस्ट, प्रीतम मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर, ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान, या चार संस्थांनी शासनाची फसवणूक केल्याचं उजेडात आणलं. थोरात यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला ही बाब निदर्शनास आणून देताच, त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाला चौकशी करुन फौजदारी कारवाईचे आदेश दिले आहेत.
त्यासंबंधीचे पत्र प्राप्त झालं नसल्याचं पालिकेच्या शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आलं, पण तिथं इंग्रजी माध्यमांच्या शाळा कशा सुरु झाल्या याबद्दलही पालिकेच्या शिक्षण विभागानं मौन बाळगलं आहे.