चाकण:  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं मिश्कीलपणे बोलणं सर्वांनाच माहिती आहे, अजित पवार कधी काय बोलतील याचा नेम नसतो. अशातच आज अजित पवारांनी एका हॉटेलच्या उद्घाटनाला हजेरी लावली, यावेळी बोलताना अजित पवारांचा मिश्कील अंदाज दिसून आला. हॉटेल मालक मला म्हणाले अजित दादा नाष्टा करुन जा, पण आज खरंच वेळ नाही. पुढच्या वेळी आलो की नक्की जेवण करेन. तेव्हा मात्र माझं बिल घेऊ नका, अशी मिश्किल टिपणी अजितदादांनी केली. पुढे म्हणाले, पण हा चेष्टेचा भाग झाला. मी स्पष्ट सांगतो. राजकारण आणि व्यवसाय स्वतंत्र ठेवा. हॉटेलमध्ये कोणी ही येऊ द्या, बिल सर्वांचं घ्या. असं केलं नाही तर दिवाळं निघेल. हॉटेल बंद करण्याची वेळ येईल, असं ही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

हनुमंत रावांनी मला दादा बसा थोडंसं नाश्ता पाणी करा म्हटलं, पण मला खरोखर आज वेळ नाही. परत कधीतरी मी जेवायला येईन. तेव्हा माझं बिल घेऊ नका, असं हसत हसत अजित पवारांनी म्हटलं. माझं जेवण बाकी राहिले असं समजा. हा गमतीचा भाग जाऊ द्या परंतु मला हनुमंत रावांना सांगायचंय आणि तुम्हाला पण सांगायचं तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असला तरी कामाच्या ठिकाणी काम करा आणि राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून उद्या कोणीही आलं, मी आलो दिलीपराव आले, किंवा आणखी कोणी आलं, तरी बिल देत चला. पैसे घेत जावा. रीतसरपणे जे असेल ते बील द्या, उगाच आपल्या जवळचा आहे, हे आलं, ते आलं, त्यांना कसं नाराज करायचं, याला कशाला नाराज करायचं, या नाराजीमध्ये आपलं हॉटेल बंद पडायची वेळ येईल असं म्हणत सर्वांकडून बिल घेत जावा असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

अजित पवार पहाटेच चाकणला...

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (8 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक आणि परिसराची पाहणी केली. पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असती. याचं चौकातून चाकण एमआयडीसीमध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं. या एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहनं ये-जा करतात.या भागातील रस्त्यांची पाहणी केली.

Continues below advertisement

पाहणी दौऱ्यावेळी पोलीस आयुक्तांना अजितदादांनी खडसावलं

मी सकाळी 6 वाजता दौरा करतोय, एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागतायेत. मग पिक टाईममध्ये काय अवस्था होत असेल, असं अजित पवार म्हणाले. तसेच अजित पावर पाहणी करत असताना चाकणच्या चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली. त्यामुळं अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले. ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केली आहे?, सगळी वाहतूक सुरु करा, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुककोंडीचा आढावा घेताना अजित पवारांनी आधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटोही दाखवले.