पुणे: बीडमधील गुन्हेगारी, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणावरून सध्या राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप, मागण्या, आंदोलने या घडामोडी मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहेत. बीडच्या या प्रकरणामुळे राज्यभरात मुकमोर्चे काढण्यात येत आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच बीड जिल्ह्याच्या नेत्या आणि मंत्री असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मात्र, यापासून स्वतःला दूर ठेवल्याचं दिसून आलं. काल (बुधवारी) जिल्ह्यात काय सुरू आहे ते मला काही माहिती नाही, मी माझ्या रोजच्या कामात व्यस्त आहे. माझ्यासाठी काम महत्त्वाचं आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यानंतर आता या प्रतिक्रियेवरून बीडचे खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonwane) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना लक्ष्य केलं आहे.
लहान मुलाला पण कळतं की...
बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी पुण्यात पत्रकार परिषदेवेळी बोलताना, पंकजा मुंडे (Pankaja Munde) पाच वर्ष कामापासून बाजूला होत्या. त्यामुळे त्यांना माहीत नाही. बीडमधील मला काही माहित नाही, अशी उत्तर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडून अपेक्षित नाहीत. लहान मुलाला पण कळतं की कुठे काय सुरु आहे, अशा शब्दात त्यांनी पंकजा मुंडेंच्या त्या वक्तव्याचा समोचार घेतला आहे.
वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रेटमेंट का मिळत आहे?
वाल्मिक कराड याच्याकडे सापडलेल्या मोबाईलबाबत मी काही बोलत नाही. सगळ्यांना बेड्या ठोकल्या पण वाल्मिक कराडला बेड्या का घातल्या नाहीत, याचा प्रश्न मी पोलिसांना विचारणार आहे. वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रेटमेंट का मिळत आहे, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
अवैध मालमत्ता संदर्भात...
वाल्मिक कराडच्या मालमत्ता आणि अनेक ठिकाणी त्याचे गाळे, वाईन शॉप असल्याची माहिती समोर आली. काही ठिकाणच्या त्याच्या गाळ्यावर आणि वाईन शॉपवरती कारवाई करण्यात आली आहे, त्याबाबत बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, अवैध मालमत्ता संदर्भात सगळ्यांना जो कायदा आहे, त्यानुसार कारवाई झाली पाहिजे. सगळीकडे संपत्ती सापडत आहे. 100 कोटींच्या पुढे मालमत्ता जात असेल तर ईडीची चौकशी नियमांनुसार करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. बीड प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंदळे सापडला पाहिजे. त्याला कोणी पळवलं हे जाणून घेतलं पाहिजे. आरोपी फरार असतात, त्यावेळी त्यांना पुरावे नष्ट करण्यात वेळ मिळतो. मोबाईल जप्त करायला वेळ लागतो. एवढा वेळ का लागतो? सरकारची यंत्रणा दिलेल्या शब्दाप्रमाणे काम करत आहे. SIT, CID किवा अनेक यंत्रणा काम करत आहे. त्यांनी शब्द पाळला, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, पवार सगळे एकत्र आहे. ते कुटुंब आहे. राजकीय दृष्ट्या एकत्र यावं की नाही, याबाबत मी सांगत नाही. पवार साहेबांची जी इच्छा असेल तिचं माझी इच्छा आहे, असंही ते पुढे म्हणालेत.