पिंपरीत दिवसाढवळ्या पतीकडून पत्नीच्या हत्येचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 06 Aug 2017 07:05 PM (IST)
फिरोज शेख नावाचा माथेफिरू काल संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आपल्या पत्नीची चाकूने हत्या करणार होता. मात्र सुदैवाने हा प्रसंग टळला.
पिंपरी : पिंपरीतील भोसरी परिसरातल्या मोशी प्राधिकरणाच्या मैदानात थरारनाट्य घडलं. फिरोज शेख नावाचा माथेफिरू काल संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आपल्या पत्नीची चाकूने हत्या करणार होता. मात्र सुदैवाने हा प्रसंग टळला. पूर्णतः भान हरवून बसलेल्या फिरोजच्या एका हातात चाकू तर दुसऱ्या हातात पत्नीची मान होती. कुणाच्याही काळजाचा थरकाप उडवणारा हा प्रकार दिवसाढवळ्या आणि खुल्या मैदानात सुरू होता. फिरोजच्या पत्नीची आरडाओरड ऐकून स्थानिक जमा झाले. त्यांनी फिरोजला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही ऐकायला तयार नव्हता. स्थानिकांनी पोलिसांना बोलवून घेतलं. पोलीस येईपर्यंत स्थानिकांनी फिरोजला बोलण्यात गुंगवून ठेवलं आणि ते हळूहळू फिरोजच्या दिशेने सरकले. संधी मिळताच सर्वांनी फिरोजच्या दिशेने धाव घेऊन त्याच्या तावडीतून पत्नीची सुटका केली. ही सगळी घटना एका प्रत्यक्षदर्शीने मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद केली. चारित्र्याच्या संशयावरून फिरोज पत्नीची हत्या करायला निघाला होता. पोलिसांनी फिरोजला अटक केली असून त्याच्या जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाहा व्हिडिओ :