पुणे: राज्याचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाच्या वृत्तामुळे पुणे शहरात (सोमवारी) एकच खळबळ उडाली होती. मात्र, प्रत्यक्षात ऋषिराज सावंत हे आपल्या दोन मित्रांसोबत बँकॉकला गेल्याचे तपासात समोर आले. ऋषिराज सावंत सोमवारी दुपारी पुण्यातील विमानतळावरुन खासगी चार्टर्ड प्लेनने बँकॉकला निघाले होते. मात्र त्याच्या अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांचे चार्टर्ड प्लेन माघारी वळवण्यात आले. त्या घटनेबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात आले, असं असतानाच याबद्दल पुणे पोलीस आयुक्त अमितेकुमार यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतंच एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाची तक्रार ते बँकॉकसाठी निघालेले विमान परत कसं आणण्यात आलं, तसेच त्यांनी आम्ही या सर्व घटनाक्रमाचा तपास करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
यावेळी बोलताना पुणे पोलीस आयुक्त अमितेकुमार म्हणाले, तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली होती. ती अपहरणाची तक्रार अद्यापपर्यंत मागे घेण्यात आलेली नाही. ऋषिराज सावंत यांचे विमान जर देशाच्या बाहेर गेलं असतं. तर ते वळवणं अवघड झालं असतं. ऋषिराज सावंत यांच्या अपहरण संदर्भात तपासात काहीही आढळलेले नाही, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
त्यानंतर विमान परत आणण्यात आम्हाला यश आलं
पुढे बोलताना अमितेश कुमार म्हणाले, ऋषिराज सावंत बिझनेस मिटिंगसाठी बँकॉकला गेले होते का, हे अद्यापपर्यंत समोर आलं नाही. त्या दिवशी तानाजी सावंत आणि त्यांचे कुटुंब घाबरलेल्या अवस्थेत होते. काही घटना घडण्याआधी पुणे पोलिसांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला. विमान वाहतूक प्रशासनाला आम्ही मेल केला होता, त्यानंतर विमान परत आणण्यात आम्हाला यश आलं. सध्या आम्ही या सर्व घटनाक्रमाचा तपास करत आहोत, असंही पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.
ऋषिकेश सावंत यांचं अपहरण झाल्याचं सोशल मिडियावर व्हायरल
तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिकेश (वय 32) यांचे अपहरण झालं आहे, ते खासगी विमानाने बँकॉकला रवाना झाला आहेत, सावंत यांना मुलाचे अपहरण झाल्याचा फोन आला होता, अशा प्रकारची माहिती सोमवारी (ता. 10) दुपारनंतर सोशल मिडियावरती व्हायरल झाली होती. कार चालकाने दिलेल्या माहितीनंतर सावंत यांनी मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याच्याशी संपर्क न झाल्याने अखेर सावंत पोलिस आयुक्तालयात पोहचले होते. आपला मुलगा कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता परदेशात जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सावंत आणि त्याचे कुटुंबीय धास्तावले. त्यांनी त्वरित ही माहिती पुणे पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी केली होती. विमानतळासह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र, अखेर सर्व माहिती समोर आली.