पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील हिंदुस्तान अॅन्टीबायोटिक्स (एचए) कंपनीमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या रामदास उकिर्डे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. गेल्या वीस महिन्यांपासून पगार रखडल्याने उकिर्डे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.


एक लहानशी कंपनी ते दुर्धर आजारांवरील औषधे बनवणारी तसेच भारतातील पहिले पेनिसिलिन इंजेक्शन तयार करणारी एचए कंपनी डबघाईला आली आहे. या कंपनीत जवळपास 950 कामगार काम करत आहेत. परंतु गेल्या दीड-दोन वर्षांपासून कामगारांच्या पगारापैकी केवळ पाच हजार रुपये देऊन त्यांची बोळवण केली जात आहे.

गेल्या वर्षभरात या कंपनीचे 44 कोटी रुपयांचे उत्पादन झाल्याचे कंपनीच्या कामगारांनी सांगितले. असे असूनही गेल्या 20 महिन्यांपासून इथे काम करणाऱ्या कामगारांचे पगार देण्यात आलेले नाहीत. पगारासाठी कामगारांनी सर्व पक्षीय खासदारांकडे विनंती केली. परंतु त्यामुळे काहीही फरक पडला नाही. परिणामी उकिर्डे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

बीएससीची पदवी घेतलेले उकिर्डे एचए कंपनीत लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. परंतु महिन्याकाठी पगारातील मिळणाऱ्या पाच हजार रुपयांमध्ये संसाराचा गाडा कसा हाकायचा, हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत होता. त्यातूनच ही आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीय करत आहेत.