पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेकडे पुण्यातील ज्या प्रभागातील मतदारांनी पाठ फिरवली, त्याच प्रभागात विक्रमी मतदान झालं आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये तब्बल 62.51 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.


पुण्यातील प्रभाग क्रमांक 15 म्हणजेच शनिवार पेठ- सदाशिव पेठ येथे 62.51% मतदान झालं आहे. पुण्यामध्ये सरासरी 54 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीचे गाजर दाखवलं गेलेल्या प्रभाग क्रमांक 9, बाणेर-बालेवाडी-पाषाण येथे सर्वात कमी मतदानाची नोंद झाली. या भागात 40.96% मतदान झालं.

पुण्यातील सदाशिव पेठेत गेल्या शनिवारी दुपारच्या वेळी भाजपची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांच्या नियमांचा अनुभव घेतला होता. मतदारांनी पाठ फिरवल्यामुळे अखेर फडणवीसांनी सभा रद्द करत पिंपरी-चिंचवडकडे कूच केली होती.

पुण्यातील सभेत काय झालं होतं ?

गर्दीच नसल्याने सभाच गुंडाळण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढावली. सदाशिव पेठेतील टिळक रोडच्या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरवल्याने, मुख्यमंत्र्यांना भाषण न करताच माघारी फिरावं लागलं. या सभेला गर्दी नसल्याचं पाहून, मुख्यमंत्र्यांनी समन्वयाचं कारण देत, सभा रद्द करत असल्याचं ट्विट केलं.

मुख्यमंत्री सभेसाठी आले, मात्र या सभेला अत्यंत तुरळक प्रतिसाद होता. दुपारच्या सभेसाठी मुख्यमंत्री येऊन 15 मिनिटे झाली, तरीही त्यांची सभा सुरु झाली नाही. गर्दीच नसल्याने मुख्यमंत्री 15 मिनिटांपासून स्टेजवर गेले नाहीत. मुख्यमंत्री स्टेजच्या बाजूलाच खाली थांबले होते.

या सभेसाठी आणलेल्या असंख्य खुर्च्या तशाच रिकाम्या दिसत होत्या. मंचावर पालकमंत्री गिरीष बापट आणि भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले होते. मात्र मुख्यमंत्री खालीच होते.

राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरासरी 56.30 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

राज्यातील 10 महापालिका आणि 11 जिल्हा परिषदांसाठी मोठ्या उत्साहात मतदान झालं. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सर्वच महापालिकांसाठी येत्या 23 तारखेला सकाळी दहा वाजता मतमोजणी केली जाणार आहे.

मुंबईसह राज्यातील 10 पालिकांमध्ये 1268 जागांसाठी तब्बल 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत.  तब्बल 21 हजार पोलिंग स्टेशनवर मतदान पार पडलं.

संबंधित बातम्या


सभेला कोणीच नाही, सभा सोडून मुख्यमंत्री रवाना!


मुख्यमंत्र्यांना ‘पुणेरी टोमणे’, सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस


अॅक्सिस-इंडिया टुडे एक्झिट पोल : पुण्यात कमळ फुलण्याची चिन्हं