मुंबई : पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलचा मार्ग मोकळा झाला आहे. आयोजनावर सवाल उपस्थित करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. कार्यक्रमासाठी 150 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 300 बाऊंसर्सची फौज तैनात असेल. किशोरवयीन मुलामुलींना मद्यपान करू देणार नाही, अशी ग्वाही आयोजक आणि राज्य सरकारने हायकोर्टात दिली.

सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे काय?


'सनबर्न फेस्टिव्हल'ला परवानगी द्यायची असेल तर आयोजकांकडून सर्व अटींचे आणि नियमांचे पालन होत असल्याची खातरजमा करूनच राज्य सरकारने द्यावी. मात्र कोणत्याही अटी-नियमाचे उल्लंघन झाले तर हायकोर्ट ते अत्यंत गांभीर्याने घेईल आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून विचारात घेतले जाईल. शिवाय त्यामुळे आयोजकांना पुढच्या वर्षी असा कार्यक्रम करणं अवघड होईल, असा आदेश कोर्टाने दिला.

न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली.

आयोजकांनी आपली बाजू मांडताना पुन्हा एकदा स्पष्ट केलं, की सनबर्न हा एक आंतरराष्ट्रीय संगीताचा कार्यक्रम आहे. जिथे देशविदेशातील कलाकार येऊन आपली कला सादर करतात. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर याचं आयोजन होतं असल्याने इथे खाण्यापिण्याची सोय करणं अनिवार्य आहे. मात्र मद्यविक्रीसाठी आवश्यक ते सर्व परवाने, नियम आणि अटी पूर्ण करूनच हा सोहळा आयोजित केला जातो. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये तसेच लाखोंच्या गर्दीत किशोरवयीन मुलांनाही नशा करण्याची, मद्यसेवनाची संधी मिळू नये, याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल. कार्यक्रमाच्या ठिकाणी 150 सीसीटीव्ही आणि 300 खाजगी बाऊन्सर्सची फौज तैनात केली जाईल.

पुण्यात सनबर्न फेस्टिव्हल होणार की नाही?


आयोजकांना आवश्यक ते सर्व परवाने मिळवणं बंधनकारक राहील. लाऊडस्पीकरच्या वापरासाठी वेळेची मर्यादा लागू राहील. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस साध्या वेशात तैनात असतील. जेणेकरून  कोणत्याही प्रकारे कायद्याचं उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असं राज्य सरकारनेही स्पष्ट केलं.

गोव्यात 8 वर्ष केलेल्या आयोजनानंतर गेल्यावर्षीपासून हा सनबर्न फेस्टिव्हल महाराष्ट्रात आयोजित होऊ लागलाय. गेल्यावर्षीच्या आयोजनादरन्यान बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे आयोजकांना 1 कोटीचा दंड आकारण्यात आलाय. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे त्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, अशी माहीती हायकोर्टासमोर ठेवण्यात आली.

सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे काय?

सनबर्न हा पूर्णत: व्यावसायिक ईडीएम अर्थात इलेक्ट्रिक डान्स म्युझिक फेस्टिव्हल आहे. ईडीएम यावरुनच हा फेस्टिव्हल कसा असेल, याचा अंदाज बांधता येईल.

डीजेचा ठोका, चकाकणारं लाईटिंग आणि बेधुंद तरुणाई असं थोडक्यात वर्णन या सनबर्न फेस्टिव्हलचं करता येईल.

हा आशियातील सर्वात मोठा, तर जगातील पहिल्या 10 फेस्टिव्हल्सपैकी एक म्युझिक फेस्टिव्हल असल्याचा दावा करण्यात येतो.

निखिल चिनापा, सनबर्न फेस्टिव्हलचा निर्माता


वेगवेगळ्या रंगात, वेगवेगळ्या ढंगात, 'बेफिक्रे' तरुणाई बेभान होऊन यात सहभागी होतात.  बिनधास्त डान्स, रापचिक म्युझिक आणि धुंदी आणणाऱ्या लाईट्समुळे हा फेस्टिव्हल परिचीत आहे.

या फेस्टिव्हलमध्ये केवळ म्युझिक आणि डान्स नाही तर विविध कला, खान-पान, थरारक गेम्स, कलाकुसर, हस्तकलांचा मेळा इथे भरतो.  त्यामुळे इथे यायचं आणि इथलंच होऊन जायचं, असं आयोजन करण्यात येतं.