पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली ही सर्रास होते. मात्र एका परदेशी नागरिकाने अशा बेशिस्त वाहन चालकांना चांगलाच धडा शिकवला. इतकंच नव्हे तर सांगवी येथील रक्षक चौकात जे घडले अन परदेशी नागरिकाने जी कृती केली. त्यामुळं वाहतूक पोलिसांना ही चपराक बसली. तर घडलं असं की, वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी थेट फुटपाथवर दुचाकी दामटणाऱ्या नागरिकांना चक्क काही परदेशी नागरिकांनी अटकाव करत शिस्तीचे धडे दिले आहेत.(Video Viral)

Continues below advertisement

Pune News: "हा रस्ता चालण्यासाठी आहे, गाडीसाठी नाही!"

सांगवी परिसरातील रक्षक चौक हा नेहमीच वाहतूक कोंडीसाठी ओळखला जातो. या कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी अनेक दुचाकीस्वार नियमांचे उल्लंघन करून पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवरून गाड्या चालवत होते. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या काही परदेशी पर्यटकांनी संताप व्यक्त केला. त्यांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता, स्वतः रस्त्यावर उतरून या दुचाकीस्वारांना अडवले."हा रस्ता चालण्यासाठी आहे, गाडीसाठी नाही!" सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, हे परदेशी नागरिक अत्यंत शांतपणे पण ठामपणे दुचाकीस्वारांना फुटपाथवरून खाली उतरण्यास सांगत आहेत. हा रस्ता चालण्यासाठी (Pedestrians) आहे, वाहन चालवण्यासाठी नाही, अशी समज त्यांनी दिली. परदेशी पाहुण्यांचा हा पवित्रा पाहून अनेक दुचाकीस्वारांची भंबेरी उडाली, तर काहींनी निमूटपणे आपली वाहने मुख्य रस्त्यावर घेतली.

Pune News: सोशल मीडियावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक व्यवस्थेवर आणि नागरिकांच्या मानसिकतेवर जोरदार टीका केली आहे. बाहेरच्या देशातून आलेल्या लोकांना आपल्याला शिस्त शिकवावी लागते, ही शरमेची बाब आहे,अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. केवळ पोलिसांना दोष देण्यापेक्षा, नागरिकांनी स्वतःहून नागरी शिस्त पाळली असती तर ही वेळ आली नसती, असेही मत व्यक्त होत आहे. 

Continues below advertisement

रक्षक चौकातील या घटनेने वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस तैनात असतानाही दुचाकीस्वार सर्रास फुटपाथचा वापर कसा करतात ? असा सवाल नागरिक विचारत आहेत.परदेशी पाहुण्यांनी दाखवलेला हा 'आरसा' पिंपरी-चिंचवडकरांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा ठरेल का ? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.