पुणे : काल रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणं पुन्हा तुडुंब भरून वाहू लागली आहेत. पाऊस सुरुच असल्याने धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवल्याने पुण्यातील डेक्कनला जोडणारा भिडे पुल पाण्याखाली गेला आहे.


पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं शंभर टक्के भरली आहेत. धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरुच असल्याने पुन्हा एकदा खडकवासला धरणाचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. खडकवासला धरणातून मुळा-मुठा नदीमध्ये सत्तावीस हजार क्यूसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असल्याने डेक्कनला जोडणारा भिडे पुल पुन्हा पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर नदी पात्रातील रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

मुळशी धरणातुन देखील सकाळी आठ वाजेपासून पंधरा हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठावरच्या लोकांना लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.