पुणे : पुण्यात मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. मुसळधार पावसामुळे धनकवडी भागातील चव्हाण सोसायटीमधील पन्नास वर्षे जुने वडाचे झाड कोसळले असून यात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, सोसायटीत राहणारे अनिल पावसकर आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या दारातच हे भले मोठे झाठ कोसळल्याने ते घराबाहेर येऊ शकत नाहीत. अग्निशमन दलाने झाड हटवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. कोथरूडमध्ये देखील काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. 


गेल्या दोन दिवसांत पुणेकर उकाड्याने हैराण झाले होते. परंतु आज झालेल्या पावसामुळे आता हवेत गारवा निर्माण झालाय. अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांना अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतंय. आंबेगावतील गायमुख ओढापूल परिसरात रस्ता पाण्याखाली गेलाय. चांदणी चौकाकडून कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. हायवेवर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीय. तर चंदननगर पोलीस ठाण्यात पावसाचं पाणी शिरलंय. 


मुसळधार पावसानंतर पुण्यातील कोथरूड परिसरातील कुंबरे पार्क या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. एका घराची भिंत पडलीय. लोक घरातील पाणी बाहेर काढत आहेत. आळंदी रस्त्यावरील दिघी येथे ढग फुटी झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाण पाणी आले आहे. पाण्याचा प्रवाह एवढा आहे की पूर आल्यासारखे दृश्य दिसत होते. रस्त्याच्या कडेला पार्कींग केलेली वाहने वाहून गेली आहेत. यात अनेक वाहनांचे नुकसान झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. 


मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. वेदभवन, कोथरुड, वनाज जवळ कचरा डेपो, लमाण तांडा, पाषाण, सोमेश्वर वाडी, वानवडी, शितल पेट्रोल पंप, बी. टी. ईवडे रोड,कात्रज उद्यान या परिसरासह अनेक महत्वाच्या रस्त्यांवर पाणी साचलंय. शिवाय शहरात सहा ठिकाणी झाड पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पाषाण येथे एनसीएल जवळ, साळुंखे विहार, कोंढव्यात ज्योती हॉटेल जवळ, चव्हाणनगर येथे रुबी हॉल जवळ आणि पुणे स्टेशन परिसरात झाडे पडली आहेत. मात्र यात कोणीतरी जीवितहानी झाली नाही. 


नागरिकांना सतर्कतेचा इशारा 
दरम्यान, मुठा नदी पात्राशेजारील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशानाकडून देण्यात आल्या आहेत. "वाढत्या पावसामुळे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सायंकाळी सात वाजता  856 क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  


राज्यभर मुसळधार 
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर पाऊस सुरू झालाय. पुण्यासह, औरंगाबाद, जळगाव, सातारा, कोल्हापूर, येथे मुसळधार पाऊस पडतोय. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलीत दवाजे उघडले आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 


पाहा व्हिडीओ