इंदापूर: गेल्या काही दिवसांमध्ये माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या त्यांना आज पुर्णविराम मिळाला आहे. आज हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कोणता निर्णय घ्यायचा याबाबत प्रश्न केले, त्यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना तुतारी फुंकण्यासाठी समर्थन दिलं. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी हा निर्णय घेण्याआधी आपण भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीत काय घडलं?
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) म्हणाले, मी शरद पवारांना भेटण्याच्या चार दिवस आधी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, त्यांनी रात्रीची वेळ दिली. दिड ते दोन तास आमची चर्चा झाली. त्यांनी काही प्रस्ताव माझ्यासमोर ठेवले, त्यांनी काही भूमिका माझ्यासमोर मांडली. मी पण माझी भूमिका त्यांच्यासमोर मांडली. त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर, मी मांडलेल्या भूमिकेवर गेल्या दोन महिन्यात तुम्ही केलेल्या आग्रहाच्या बाबतीतील भूमिका या सर्वांवर माझी आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली. मी त्यावेळी फडणवीसांना सांगितलं, मला माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या विरोधात जाता येणार नाही. ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी गेल्या दहा वर्षांत माझ्यासाठी मोठा संघर्ष केला, मोठा अन्याय सहन केला. त्या माझ्या कार्यकर्त्यांने माझी साथ कधी सोडली नाही. आज तुम्ही सांगाल त्यानंतर मी जो निर्णय घेईल तो व्यक्तीगत होईल , त्या व्यक्तीगत निर्णयापेक्षा मला माझ्या इंदापुरातील माझ्या आम जनतेच्या भावनेसाठी, त्या भावनेच्या मागं उभं राहावं लागेल, हे मी फडणवीसांना सांगितलं, त्यावर फडणवीस म्हणाले, ठिक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं तो निर्णय घ्या, माझ्याही भावना समजून घ्या, असं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं आहे.
शरद पवारांना भेटलो- काय काय चर्चा झाली?
हर्षवर्धन पाटील म्हणाले, विधानसभेबाबत काय निर्णय घ्यायचा यासाठी सर्वांना बोलवलंय. काल सिल्व्हर ओकवर शरद पवारांशी बैठक झाली. पवारांनी काल विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या. त्यानंतर बाकीची जबाबदारी माझी राहील. मग आपण प्रवेश करायचा की नाही? हे माझ्या इंदापूरच्या जनतेने ठरवावे. इंदापूर तालुक्यातील सर्व राजकीय निर्णय जनतेच्या मताने झाले आहेत. इंदापुरात कोणाच्या स्वार्थासठी निर्णय होत नाहीत.