पुणे : गोष्ट सांगण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावावर (Guinness World Record) नोंद झालाय.  पुण्यातील एस पी कॉलेजच्या मैदानावर तीन हजारांहून अधिक पालकांनी त्यांच्या पाल्यांना गोष्ट सांगण्याचा विश्वविक्रम केलाय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. आतापर्यंत हा विश्वविक्रम चीनच्या नावावर होता. चीनमधे एकाचवेळेस बावीसशे पालकांनी त्यांच्या मुलांना एकाचवेळी गोष्टी सांगितल्या होत्या. नॅशनल बुक ट्रस्ट मार्फत आयोजित पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील एस पी कॉलेजच्या मैदानावर गोष्ट सांगण्याच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.  पालकांनी आपल्या मुलांना तीन मिनिटं पुस्तक वाचून दाखवलं आहे. पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं, या रेकॉर्डमुळे पुण्यानं आता जगाच्या पातळीवर आपलं नाव उंचावलं आहे.


शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात 'वर्ल्ड बुक कॅपिटल' होण्याची क्षमता आहे. या विश्वविक्रमाच्या निमित्ताने युनेस्कोचे निकष पूर्ण करण्याचा महापालिकेकडून प्रयत्न करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बातमधून लहान मुलांना कथा किंवा गोष्टी सांगण्याचे फायदे सांगितले आहे. याद्वारे मुलांना आपल्या संस्कृती आणि इतिहासबद्दल माहिती मिळून ती लक्षात राहते. याचे शैक्षणिक फायदे सुद्धा आहे. याला अनुसरूनच पालकांकडून आपल्या पाल्यांना गोष्टी सांगण्याचा उपक्रमआयोजित करण्यात आला  आहे. 


या उपक्रमात पुणे महापालिकेच्या शाळा मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. त्याचबरोबर डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसह अनेक शिक्षण संस्थांच्या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यावेळी सुमारे 3 हजारांहून आधिक पालकांनी आपल्या पाल्यांना विविध गोष्टी, कथा वाचून दाखवल्या आहे यापूर्वीचा, पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी किंवा कथा सांगण्याचा विश्वविक्रम चीनच्या नावे असून, तो तोडण्यात पुणे यशस्वी ठरलं आहे. 


वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणजे नक्की काय ?


वर्ल्ड बुक कॅपिटल हा युनेस्कोचा एक उपक्रम असून, तो 23 एप्रिलपासून सुरू होता. शहरामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण पाया असतो. या अंतर्गत शहाराला एका वर्षासाठी पुस्तकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी वर्ल्ड बुक कॅपिटलचा दर्जा देण्यात देतो. युनेस्को वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून नियुक्त केलेली शहरे ही सर्व वयोगटातील वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि युनेस्कोची मूल्ये सामायिक करण्याच्या उद्देशाने उपक्रम राबवतात.


इतर महत्वाची बातमी-


Jhimma 2 : "अन् मैत्रीचा सोहळा होतो"; मनाला भावुक करणारा 'झिम्मा 2'चा नवा ट्रेलर आऊट