पुणे: राज्यभरात अनेक ठिकाणी गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या मेंदूविषयक आजाराने गेल्या काही दिवसांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे जीबीएसमधून (Guillain Barre Syndrome) बरे होत असलेल्या 38 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशातच दिलासादायक बाब म्हणजे, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या 28 वरून 21 पर्यंत घटली आहे. जीबीएस (Guillain Barre Syndrome) आजाराच्या नवीन नऊ रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्णसंख्या 158 वरती पोहोचली आहे. यापैकी 83 रुग्ण महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. उर्वरित 31 रुग्ण पुणे महापालिका, 18 पिंपरी चिंचवड महापालिका, 18 रुग्ण पुणे ग्रामीणमधील आहेत. इतर जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या आठ आहे. एकूण रुग्णांपैकी 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर 48 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.
सर्वेक्षण आणि उपाययोजना
या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून घरोघरी सर्वेक्षण करून आजपर्यंत पुणे पालिकेतील 40 हजार 802 घरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 11 हजार 203 घरे आणि पुणे ग्रामीणमधील 12 हजार 571 अशा एकूण 64 हजार 567 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागांमधील160 पाणी नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेले आहेत. त्यापैकी पाण्याचे आठ नमुने पिण्यास अयोग्य आहेत.
हे उपाय करा...
पाणी उकळून थंड करून प्या.
पाण्याच्या सुरक्षितते बाबत खात्री नसल्यास बाटलीबंद पाणी वापरा.
जेवण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुवा.
बाहेरील अस्वच्छ बाबी हाताळताना काळजी घ्या.
पाच संशयास्पद मृत्यू
आतापर्यंत जीबीएसच्या पाच संशयास्पद मृत्यू देखील नोंदवले गेले आहेत. जीबीएस हा एक दुर्मिळ आजार आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून नसांवर हल्ला करते. मज्जा तंतूंच्या काही भागांना नुकसान पोहोचवते. त्यामुळे स्नायू कमकुवत होणे, मुंग्या येणे, संतुलन गमावणे आणि पक्षाघात होतो. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण व शहरामध्ये 132, पिंपरी-चिंचवड महापालिका व ग्रामीणमध्ये 18 तर इतर जिल्ह्यांतील आठ रुग्ण आहेत.
जीबीएस रोग म्हणजे काय?
GBS ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे अचानक बधीरपणा आणि स्नायू कमकुवत होतात, ज्याच्या लक्षणांमध्ये हातपाय गंभीर कमजोरी, अतिसार इ. डॉक्टरांच्या मते, जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग सामान्यत: जीबीएसला कारणीभूत ठरतात कारण ते रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात आणि सध्याच्या परिस्थितीत, हा रोग दूषित पाण्यामुळे सुरू झाल्याचा संशय आहे.
काय काळजी घ्यावी
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?
दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.
कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे
अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या