पुणे : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या जेजुरी गडावरील खंडेरायाच्या मुख्य मंदिरावरील कलशास सोन्याचा मुलामा देऊन आज विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर खंडोबाच्या मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीसुद्धा करण्यात आली.

जेजुरी गडावर ‘सुवर्णकलश’, विधीवत पूजेनंतर हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी


देवस्थानने मुख्य मंदिरावरील कलश सोनेरी करण्याचे काम काही दिवसांपूर्वी हाती घेतले होते. खंडोबाला दानपेटीतून अर्पण केलेल्या सोन्याच्या 1250 ग्रॅम (सव्वा किलो) शुद्ध सोन्यातून मुख्य मंदिराच्या व अन्य सहा उपकलशांना सोन्याचा मुलामा देण्याचे काम पूर्ण झाले.



आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर या दिवशी नाशिक, सोळशी, वाई या भागातून कलशपूजनासाठी महाराज बोलवण्यात आले होते. त्यांच्या हस्ते होमहवन, लघुरुद्र, मल्हारी सहस्त्रनाम व धार्मिक विधी करण्यात आले. पूजेनंतर खंडोबाच्या मंदिरावर हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात आली.