बेबी डायपरमधून सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश
एबीपी माझा वेब टीम | 12 Dec 2017 01:48 PM (IST)
बेबी डायपरमधून सोन्याची तस्करी होत असल्याचा प्रकार पुण्यात उघड झाला आहे.
पुणे : बेबी डायपरमधून सोन्याची तस्करी होत असल्याचा प्रकार पुण्यात उघड झाला आहे. डायपरच्या प्रेस बटणमध्ये सोन्याच्या 2 ते 3 ग्रॅमच्या सोन्याच्या रिंग लावून ही तस्करी केली जात होती. अशा ६०६ ग्रॅमच्या रिंग सीमा शुक्ल विभागाने जप्त केल्या आहेत. या कारवाईत जप्त केलेल्या सोन्याची किंमत जवळपास १८ लाख रुपये असल्याचं समजतं आहे. पुण्यातील लोहगाव विमानतळावर सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली. दुबईहून स्पाईस जेटचे एक विमान लोहगाव विमानतळावर उतरले. तपासादरम्यान एका प्रवाशाकडे बेबी डायपर आढळले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर सोने तस्करीचा प्रकार समोर आला. सोन्यावर रेडियम कोटींग केल्याचंही आढळून आल्याचं सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त भारत नवले यांनी सांगितंल. दरम्यान, दुबई व अबुधाबीहून येणाऱ्या विमानातून प्रामुख्याने सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्यामुळे पुणे विमानतळावर येणाऱ्या या विमानांची आणि विमान प्रवाशांची कसून तपासणी केली जाते. त्यातून आजवर अनेक तस्करीची घटना उघडकीस आल्या आहेत.