पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौकात आज (बुधवारी) सकाळी एका तरुणीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे डांगे चौकाच्या आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात ती तरुणी जबर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्याच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विकास शेटे नावाच्या तरुणाने तिच्यावर चाकूहल्ला केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

विकास याचे पीडित तरुणीवर प्रेम होते. परंतु त्या तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत लग्न जमले होते. तरिदेखील विकास तिच्याकडे लग्न करण्यासाठी तगादा लावत होता. त्यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते. वैतागलेली तरुणी विकासकडे दुर्लक्ष करु लागली. याच रागातून विकासने तिला संपवण्याचा निर्णय घेतला.

संतापलेल्या विकासने आज (बुधवारी)सकाळी 9 च्या सुमारास डांगे चौकाजवळ तिच्यावर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात ती जबर जखमी झाली. हल्ल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी विकासला पकडून चोप दिला. स्थानिकांनीच विकासला वाकड पोलिसांच्या हवाली केले.