पुणे : मी 2015 मध्ये 12 वीला असताना आयसिसकडे ओढले गेले होते, मात्र मौलवींच्या समुपदेशनाने भानावर आले, अशी कबुली पुण्यातल्या संशयित तरुणीने आज पत्रकार परिषदेत दिली.


संबंधित तरुणी ही जम्मू काश्मीरमध्ये घातपात करेल, असा संशय तिच्याबद्दल व्यक्त करण्यात आला होता. त्यावेळी तिला अटक झाल्याचीही बातमी आली होती. या सगळ्याबद्दल तिने आज सविस्तरपणे पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली.

“आपण 16 जानेवारीला आईसोबत श्रीनगरला गेले होते, ते शिक्षणासाठीच. तिथे एका मैत्रिणीने माझी राहण्याची व्यवस्था केली. मात्र 25 जानेवारीला वृत्तपत्रातील पुण्यातील एक तरुणी घातपात करणार असल्याच्या बातमीनं मी हादरुन गेले. याबद्दल आईला सत्यता तपासायला सांगितली, पुणे पोलिसांशी संपर्क केला, काश्मीरातही विविध यंत्रणांनी याबद्दल माझी चौकशी केली, त्यातून काहीही हाती आलं नाही.”, असे तरुणीने सांगितले.

तसेच, “मला काश्मीर पोलिसांनी अटक केली नव्हती, तर मीच त्यांच्यासमोर स्वत:हून हजर झाले.”, असंही या तरुणीने यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलं.