पुणे : "वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या, असं खळबळजनक वक्तव्य पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केलं आहे. अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे राष्ट्रीय अधिवेशन आणि राष्ट्रीय डाळिंब परिषद पुण्यात संपन्न झाली. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


"पुढं काय होईल काय नाही याची चर्चा मी इथे करत नाही. पण पुढे काय होणार आहे हे मला माहिती आहे. कोणाचही सरकार असो. शेतकऱ्यांना मदत करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे जे काही मागायचं असेल, ते आत्ताच मागून घ्या"असं वक्तव्य गिरीश बापटांनी केलं आहे.

डाळिंब उत्पादकांनी काही मागण्या गिरीश बापटांकडे केल्या होत्या. त्यावर बोलण्याच्या ओघात बापटांनी पुढील सरकार बद्दल हे वक्तव्य केलं.

कोरेगाव भीमा प्रकरणावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठत आहे. एकतर सरकारला परिस्थितीचा अंदाज आला नाही, त्यामुळे याची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसकडून होत आहे.

याशिवाय, या प्रकरणावर राज्य सरकारच्या कामाबाबतही काही मंत्री खासगीत नाराजी व्यक्त करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर बापट यांचे वक्‍तव्य महत्वपूर्ण मानले जात आहे.

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडत असल्याने पेट्रोल, डिझलचे दर वाढत आहेत. पुढील काही महिने हिच स्थिती कायम राहील, असा अंदाज तज्ञ्जांकडून व्यक्त होत आहेत. या परिस्थितीतून राज्य सरकार काय आणि कसा मार्ग काढणार यावरच सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.