मुंबई: मराठवाड्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या पैलवान राहुल आवारेनं अखेर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या व्यासपीठावर भारताचा तिरंगा डौलानं फडकवला.


गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनात राहुल आवारेच्या हाताला सोनं लागलं आणि दिवंगत रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदारांचं स्वप्न साकार झालं.

आपल्या पट्टशिष्यानं... राहुल आवारेनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवावं हे स्वप्न २०१० साली पहिल्यांदा पाहिलं होतं ते बिराजदार मामांनी. पण त्या वेळी राहुल निवड चाचणीत अपयशी ठरला आणि २०१४ साली भारतीय कुस्ती महासंघानं निवड चाचणीच गुंडाळून ठेवून पैलवानांचा चमू ग्लास्गोवारीवर धाडला.

साहजिकच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सुवर्णपदकासाठी राहुल आवारेला तब्बल आठ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. या आठ वर्षांत राहुलच्या वाट्याला अनेक दुखापती, अन्याय आणि उपेक्षाही आली. पण त्यानं अजिबात निराश न होता राहुलनं प्रतिकूल परिस्थितीशी कठोर संघर्ष केला. आणि गोल्ड कोस्टच्या भूमीत बिराजदार मामांचं स्वप्न स्वप्न साकार केलं.

राहुल आवारेनं ५७ किलो गटाच्या पहिल्या दोन्ही कुस्त्यांवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. त्यानं इंग्लंडचा जॉर्ज रॅम आणि ऑस्ट्रेलियाचा थॉमस सिचिनी यांना लिलया हरवलं.

मग राहुलनं पाकिस्तानच्या मुहम्मद बिलालला १२-८ असं नमवून अंतिम फेरीत धडक मारली.

निर्णायक कुस्तीत राहुल आवारेचा मुकाबला होता कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशीशी. तोही तितकाच ताकदीचा पैलवान होता. पण राहुलनं ताकाहाशीचा कडवा संघर्ष १५-७ असा आठ गुणांनी मोडून काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

गोल्ड कोस्टच्या भूमीतलं गोल्ड हे राहुल आवारेनं आंतरराष्ट्रीय कुस्तीत मिळवलेलं हे तिसरं मोठं यश होतं. याआधी २०११ साली त्यानं राष्ट्रकुल कुस्तीत सुवर्ण आणि आशियाई कुस्तीत कांस्य अशी कामगिरी बजावली आहे. राहुलनं आजवरच्या कारकीर्दीत २१ लहानमोठ्या पदकांची कमाई केली आहे. त्यात राष्ट्रीय कुस्तीतल्या सलग सहा विजेतीपदांचाही समावेश आहे.

राहुल आवारे हा मूळचा बीड जिल्ह्यातल्या पाटोद्याचा पैलवान. तसं पाहिलं तर आवारे कुटुंब हे मूळचं नगर जिल्ह्यातल्या माळेवाडीचं. राहुलचे वडील बाळासाहेब आवारेनी आपल्या लेकरांच्या चांगल्या भविष्यासाठी माळेवाडीतून पाटोद्यात स्थलांतर केलं. एका जमान्यात बाळासाहेब आवारे हे स्वत: पट्टीचे पैलवान होते.

राहुल आणि धाकट्या गोकुळला त्यांनीच त्याचे कुस्तीची गोडी लावली. पाटोद्यातल्या पत्र्याच्या शेडमध्ये राहुलनं पैलवानकीची बाराखडी गिरवली. मग हरिश्चंद्र बिराजदारांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला.

बिराजदार मामांच्या आकस्मिक निधनानंतर राहुल अर्जुनवीर काका पवारांच्या तालमीत दाखल झाला. पण बिराजदार मामांची गोकुळ वस्ताद तालीम असो किंवा काका पवारांचं कात्रजमधलं आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल... दोन्ही तालमींचं घराणं एकच आहे बिराजदार मामांचं घराणं. कारण काका पवार हेही बिराजदार मामांचेच शिष्य. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गानं जाणारा पांथस्थ. त्यामुळं एका अर्थानं दोन्ही तालमी म्हणजे त्या हरिश्चंद्राच्या फॅक्टरी.

हरिश्चंद्राच्या एका फॅक्टरीतून एका जमान्यात अर्जुनवीर काका पवारांसारखा हीरा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कुस्तीला मिळाला. त्याच काका पवारांनी हरिश्चंद्रांच्या दुसऱ्या फॅक्टरीतून राहुल आवारे, उत्कर्ष काळे आणि विक्रम कुऱ्हाडे ही रत्नं घडवली आहेत.

त्या तीन रत्नांमधल्या एकानं, म्हणजे राहुल आवारेनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सुवर्णपदकाचं स्वप्न तर साकार केलं आहे. पण आमची भूक कुठे अजून भागली आहे? आम्हाला राहुल आवारेकडून अजूनही हवं आहे ते एशियाड आणि ऑलिम्पिकचंही पदक. काय राहुल, देणार ना आम्हाला, एशियाड आणि ऑलिम्पिकचं पदक?

संबंधित बातम्या
वाघासारखी झुंज, चित्त्यासारखी झेप, पैलवान राहुलने राष्ट्रकुल गाजवलं!

सलग 3 कुस्त्या खेळून दमली, तरीही लढली, बबिताकुमारी रौप्यपदक जिंकली ! 


वायूवेगाने विजय, पैलवान सुशीलकुमारला 80 सेकंदात सुवर्ण!