पुणे : दरवर्षी होणाऱ्या वैभवशाली गणेशोत्सवाचा डामदौल रद्द करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच करण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला. 127 वर्षाची वैभवशाली परंपरा असलेला हा गणेशोत्सव यंदा प्रथमच मुख्य मंदिरात होणार आहे.गणेशभक्त आणि नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

Continues below advertisement

भव्यदिव्य देखाव्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ओळखला जातो. दरवर्षी देशभरातील प्रमुख मंदिरांचे भव्यदिव्य देखावे साकारण्यासाठी म्हणून या गणपती ट्रस्टची ओळख आहे. हा देखावा पाहण्यासाठी पुण्यासह राज्यभरातून नागरिक येत असतात. परंतु दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून आणि बाप्पांच्या दर्शनाला होणारी अलोट गर्दी पाहून रस्त्यावर होणारा हा उत्सव मंदिरातच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला सामूहिक महिला अथर्वशीर्ष पठण, शालेय विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण यासह इतरही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. गणेशभक्तांना मंदिरात प्रवेश न करता बाहेरूनच बाप्पाचे दर्शन भाविकांना घेण्यात येणार आहे. हार, फुले, पेढे, नारळ, देखील स्वीकारले जाणार नाहीत आणि प्रसादही दिला जाणार नाही.

Continues below advertisement

उत्सवकाळात आरती ऑनलाईन पद्धतीने भाविकांना अनुभविता येणार आहे. सकाळी 7.30 आणि रात्री 9 वाजता ही आरती भाविकांना सोशल मीडियाद्वारे घरबसल्या पाहता येणार आहे. ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे उत्सवकाळात 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.