पुणे : शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील एका व्हॉट्सअॅप चॅटमुळे अडचणीत आले आहेत. आढळराव पाटलांनी एका व्हाट्सअॅप ग्रुपवरती पुण्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळा कदम हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे पंटर आहेत, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यामुळे वादाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये काही माध्यम प्रतिनिधींसोबतच शिवसेनेचे वरिष्ठ नेतेही आहेत.


काही दिवसांपूर्वी पुण्याची जबाबदारी असलेल्या शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याची तक्रार शिवसेनेच्याच स्थानिक नेत्यांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर मिलिंद नार्वेकर यांच्याकडे केल्याची बातमी एका वेब पोर्टलने कोणाचंही नाव न घेता प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची लिंक या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर करत पत्रकारांनी स्थानिक नेत्यांनी तक्रार केलेला तो वरिष्ठ नेता कोण? असा प्रश्न विचारला होता. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना माजी खासदार आढळराव पाटील यांनी तो नेता म्हणजे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळा कदम असल्याचं सांगितलं होतं. एवढंच नाहीतर, बाळा कदम हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे पंटर असल्याची शेरेबाजीही या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये केली होती.


विशेष बाब म्हणजे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या या शेरेबाजीला शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनीही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एक इमोजी टाकत प्रतिसाद दिला होता. काही वेळाने आपल्या वक्तव्याचं गांभीर्य लक्षात येताच, माझी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपमधील तो मेसेज डिलीट केला होता. पण तोपर्यंत आढळरावांच्या व्हॉट्सअॅप पोस्टचे स्क्रिनशॉर्ट व्हायरल करण्यात आले होते. तसेच या प्रकरणानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आढळराव यांचा समाचार घेतल्याचंही समजतंय. या सर्व प्रकरणासंदर्भात आढळरावांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.