पुणे: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे यश साजरं करण्यासाठी पिरंगुटमध्ये हत्तीवरून काढलेली मिरवणूक आणि पेढेवाटप भोरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे आमदार शंकर मांडेकर (shankar mandekar) यांच्या कार्यकर्त्यांना महागात पडलं आहे. हत्तीवरून मिरवणूक काढल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याची माहिती आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागाने शंकर मांडेकर (shankar mandekar)  यांच्या मिरवणुकीचे संयोजक आणि हत्ती देणाऱ्या तासगाव गणपती पंचायतन संस्थांन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे. शंरक मांडेकरांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री पिरंगुट येथे मांडेकर (shankar mandekar)  यांची हत्तीवर मिरवणूक काढली होती. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आदित्य परांजपे यांनी अधिक माहिती घेतली. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. 


त्यामुळे आता हत्तीवरुन मिरवणूक काढणं आमदार शंकर मांडेकरांच्या चांगलंच अंगलट आल्याचं दिसून येत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भोर - वेल्हा - मुळशी मतदारसंघाचे आमदार असलेल्या शंकर मांडेकर यांची रविवारी पिरंगुट गावात मिरवणूक काढण्यात आली होती. मांडेकर आमदार बनल्याच्या आनंदात कार्यकर्त्यांनी सांगलीवरुन हत्ती मागवला होता. मांडेकर आमदार झाले यासाठी या हत्ती वरुन पेढे वाटण्यात आले.  मात्र, वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा ठरत असल्याने वन विभागाने कारवाई सुरु केली आहे. या प्रकरणी मिरवणुकीचे आयोजक राहूल बलकवडे यांच्यासह हत्ती ज्यांच्या मालकीचा आहे, त्या तासगाव गणपती पंचायतन संस्थांन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी वन विभागाचे पथक हा हत्ती सध्या जिथे आहे, त्या सांगली जिल्ह्यातील तासगावला जाणार आहे.


हत्ती वरुन पेढे वाटल्याचे फोटो व्हिडिओ व्हायरल


शंकर मांडेकर यांची रविवारी पिरंगुट गावात मिरवणूक काढण्यात आली. पेढे वाटण्यात आले, जंगी उत्साह साजरा करण्यात आला. या मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मिडियावरती चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आदित्य परांजपे यांनी अधिक माहिती घेतली. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.  


शंकर मांडेकरांची सोशल मिडियावर पोस्ट


आमदार शंकर मांडेकरांनी या मिरवणुकीचा व्हिडिओ देखील त्यांच्या सोशल मिडियावरती शेअर केला आहे, त्याचबरोबर या मिरवणुकीसाठी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत. उरवडे - आंबेगाव - बोतरवाडी - मारणेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी हत्तीवरून मिरवणूक काढत प्रेम व्यक्त केले . भोर - राजगड - मुळशी मतदार संघाच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल उरवडे,आंबेगाव, बोतरवाडी, मारणेवाडी, गाडेवाडी, कांजणेनगर, शेलारवाडी, काळभोरवाडी,चोरघेवाडी, बलकवडेवाडी, गवळीवाडा व पंचक्रोशीतील मधील ग्रामस्थ मंडळींनी माझी अभूतपूर्व अशी हत्तीवरून मिरवणूक काढत सुमारे १२५ किलो पेढे वाटले. ह्या सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर व्यक्त केलेले प्रेम मी कदापि विसरू शकत नाही. माझ्या वर नागरिकांनी टाकलेला विश्वास हा माझ्या कामातून सिद्ध करून दाखवीन हा विश्वास मी देतो. ह्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या पंचक्रोशीतील माझ्या माय - बाप जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.