पुणे : आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मुस्लीम समाजानं आज पुण्यात विराट मूकमोर्चा काढला. गोळीबार मैदानापासून ते काऊन्सिल हॉलपर्यंतच्या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आली, तर काही रस्ते बंद करण्यात आले.
मोर्चात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण भागातील मुस्लीम बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले. हातात तिरंगा आणि फलक घेऊन मुस्लीम समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले.
सोलापूर रस्ता स्वारगेट ते भैरोबानाला दरम्यान, कोंढव्याकडून गोळीबार मैदानाकडे येणारा रस्ता, लुल्लानगर चौकापासून तर नेहरू रस्ता, ढोले पाटील चौकातून मालधक्क्यापर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली. दरम्यान विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.
काय आहेत मुस्लीम समाजाच्या मागण्या?
- मुस्लीम आरक्षण तात्काळ लागू करा
- अनुसुचित जाती आणि मुस्लीम समाजावरील अन्यायाच्या घटना थांबवा
- मॉब लिंचिंग घटनेतील आरोपींना फाशी द्या
- मुस्लीम विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह देण्यात यावी
- मुस्लीम वक्फ बोर्ड जमिनीवरील अतिक्रमण थांबवा
- मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटींची तरतूद करा