हवाईदलाच्या 'त्या' विमानात निगडीचे कुणाल बारपट्टे बेपत्ता
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 24 Jul 2016 05:40 AM (IST)
पुणे : पोर्ट ब्लेअरला जाताना बेपत्ता झालेल्या विमानातील फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे यांचाही समावेश आहे. हवाईदलाच्या बेपत्ता विमानात असलेले फ्लाईट लेफ्टनंट कुणाल निगडीत राहणारे आहेत. 28 वर्षीय कुणाल बारपट्टे हे या विमानात नेव्हिगेटर म्हणून कार्यरत होते. निगडी प्राधिकरणातील सिंधुनगर एलआयजी कॉलनीमधील ते रहिवासी आहेत. राजेंद्र आणि विद्या बारपट्टे यांचे ते ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांना एक धाकटा भाऊ आहे. विमान बेपत्ता झाल्याची माहिती समजल्यावर बारपट्टे परिवाराला मोठा धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने कुणाल यांच्या आई-वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले. कुणाल यांचे मामा दिनेश पाटील यांनी हवाई दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीही माहिती मिळू न शकल्याने चिंतेत भरच पडली. या घटनेबाबत संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी ट्विटरवर केलेल्या ट्विटवर दिनेश पाटील यांनी कुणाल यांच्याविषयी विचारणा केली. त्यानंतर हवाई दलाचे अधिकारी सातत्याने बारपट्टे परिवाराच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडूनही ठोस माहिती मिळत नसल्याने बारपट्टे परिवाराची अस्वस्थता वाढली आहे.