“सैराट सिनेमा येईपर्यंत जग सुंदर होतं, सगळं चांगलं सुरु होतं, सैराट आला आणि अचानक बलात्काराच्या घटना घडू लागल्या, कोपर्डी घटना तर सैराटमुळे घडली असंही काही जण म्हणू लागले आहेत, असं असेल तर सैराटला सुळावर चढवा आणि मलाही सुळावर चढवा”, अशी खंत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली.
संबंधित बातमी : 'सैराट'सारख्या सिनेमांमुळे बलात्कारांमध्ये वाढ : भाजप आमदार
पुण्यात नारी समता मंच तर्फे छाया तमायचेकर या जाती निर्मुलनाचे काम करणाऱ्या आणि खतना या कुप्रथे विरोधात काम करणाऱ्या गटास ‘कन्या महाराष्ट्राची’ पारितोषिक नागराज मंजुळे यांच्या हस्ते देण्यात आले. तिथे नागराज यांनी ही खंत बोलून दाखवली.
सैराटमुळे बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ : मनिषा चौधरी
‘सैराट’सारख्या सिनेमांमुळे मुलं बिघडत आहेत, बलात्काराच्या घटना वाढत आहेत, असं अजब तर्कट भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी विधानसभेत कोपर्डी बलात्कार प्रकरणाची चर्चा असताना मांडलं होतं. शिवाय, ‘सैराट’सारख्या सिनेमांवर बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. कोपर्डीतील आरोपींना कडक शिक्षेची तजवीज करण्याऐवजी मनिषा चौधरींनी अजब विधान केलं होतं.