पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी ज्या विभागाकडे असते त्या स्थायी समितीच्या कार्यालयाचा ताबा आज एसीबीने घेतला होता. त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली. स्थायी समितीची आजची बैठक पार पडल्यानंतर एसीबीने इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर काही वेळात मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे यांना पालिकेच्या पार्किंगमध्ये रंगेहात पकडण्यात आलं. तिथून एसीबीने पिंगळेना स्थायी समितीच्या कार्यलयात आणलं. तब्बल दोन तास एसीबीने कार्यालयाचा ताबा घेतला. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेंसह मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना ताब्यात घेतलं. पण नेमकी कोणत्या प्रकरणात आणि किती रक्कम ताब्यात घेतली ही माहिती अद्याप ही एसीबीने दिलेली नाही. परंतु, तक्रारदार ठेकेदार असल्याचं सूत्रांकडून समजलं आहे. सत्ताधारी भाजप मात्र यामुळे अडचणीत येण्याची चिन्ह आहेत.


एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेकडे पाहिलं जायचं. इथला विकास आणि भ्रष्टाचार देखील तितकाच चर्चेचा विषय असतो. याच विकासाची खलबत ज्या स्थायी समितीच्या बैठकीत पार पडतात, ती बैठक प्रत्येक बुधवारी पार पडते. कोरोनाचा काळ असल्याने सध्या बैठका ऑनलाईन पार पडतायेत. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर स्थायी समिती सभागृहात पार पडत असलेल्या आजच्या ऑनलाईन बैठकीला अद्यक्ष नितीन लांडगे, मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे सह मोजकेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तर उर्वरित सदस्य, अधिकारी आणि पदाधिकारी त्यांच्या उपस्थितस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभागी झाले होते. साधारण अडीच वाजताच्या सुमारास सुरू झालेली ही बैठक जेमतेम काही मिनिटं चालली. आता आर्थिक विषयी म्हटल्यावर या बैठकीच्या वेळी ठेकेदारांची मोठी गर्दी इमारतीत असते. आजही तशीच परिस्थिती होती. बैठक संपली अनd त्याचवेळी एसीबीचं एक पथक सापळा रचून इमारतीत आणि परिसरात बसलं होतं. 


अन् अचानक एसीबीचा छापा
पाचच्या सुमारास मुख्य लिपिक पिंगळे पालिकेच्या पार्किंगमध्ये गेले आणि तिथं एका तक्रारदारकडून काही लाखांची रक्कम स्वीकारत होते. तेव्हाच एसीबीने त्यांना रंगेहात ताब्यात घेतलं. तोपर्यंत महापालिकेत नेमकं काय घडतंय याची कल्पनाच नव्हती. एसीबी जेव्हा पिंगळेंना घेऊन स्थायी समितीच्या कार्यालयात घेऊन आली तेंव्हा सर्वांना धक्का बसला. एसीबीने कारवाई केल्याचं पालिका वर्तुळात चर्चा रंगली, हळूहळू शहरभर बातमी पसरली आणि एकच खळबळ उडाली. एसीबीने स्थायी समितीचा ताबा घेतला आणि पिंपरी चिंचवड पोलिसांची फौज मागवली. तिसऱ्या मजल्यावरील मोठा फौजफाटा तैनात झाला. स्थायी समितीच्या कार्यालयात अध्यक्ष नितीन लांडगेसह मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळेसह कर्मचारी आणि एसीबीचं पथक इतकेच जण उपस्थित होते. 


पाच पैकी किती जणांना अटक याची अद्याप माहिती नाही
साधारण दोन तास कसून चौकशी सुरू होती. इथली चौकशी संपली आणि आधी तक्रारदाराला बाहेर आणलं गेलं. हे ठेकेदार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. मग त्यानंतर स्थायी समिती कार्यालयातील मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना ताब्यात घेऊन एसीबी बाहेर पडलं. तर काही वेळाने स्थायी समिती अध्यक्षांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेऊन एसीबी रवाना झाली. यामुळे सत्ताधारी भाजप अडचणीत येण्याची चिन्ह निर्माण झालीत. दुसरीकडे नेमकी कोणाकडून, किती आणि कशासाठी लाच घेतली जात होती. याबाबत एसीबीने कोणतीही माहिती समोर आणलेली नाही. गुन्हा दाखल केल्यानंतर पाच पैकी किती जणांना अटक केलं आणि त्यामागचं नेमकं कारण काय हे एसीबी प्रेस नोट मधूनच समोर आणणार असल्याचं कळतंय.