बारामती : राज्याचे दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्याकडे 50 कोटींची खंडणी मागणाऱ्या पाच आरोपींना बारामतीत अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे. बारामती येथील हॉटेल कृष्णसागर येथे पोलिसांनी सापळा रचून ही धडक कारवाई केली.


महादेव जानकर आणि शेळी व मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब दोडतले यांना संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी आरोपींकडून देण्यात येत होती. क्लिप व्हायरल न करण्यासाठी 50 कोटींची खंडणीची मागणी आरोपींकडून केली जात होती. तसेच खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली होती.


अखेर 50 कोटी रुपयांची खंडणीची मागणी तडजोडीनंतर 30 कोटींवर आली होती. या रकमेचा पहिला हप्ता 15 कोटी रुपये देण्याचं ठरलं. त्यानुसार आरोपी पहिल्या टप्प्यातील रक्कम स्वीकारण्यासाठी आले असता पोलिसांनात त्यांना रंगेहात अटक केली. डॉ. इंद्रजीत भिसे, सचिन पडळकर, दत्ता करे, तात्या कांरडे, विकास अलदर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.


आण्णासाहेब रुपनवर यांच्या फिर्यादीवरुन पाचही आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.