पुणे : ‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी पुण्यात घडला आहे. हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.


घरकामासाठी आलेल्या बाईवर जात लपवून ‘सोवळे मोडले’ म्हणून मेधा खोले यांनी पोलिसात तक्रार केली आहे. दरम्यान, याप्रकरणाची नेमकी तक्रार कशी नोंदवून घ्यायची याबाबत पोलिसांना देखील प्रश्न पडला होता. त्यांनी मेधा खोले यांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला. पण तरीही मेधा खोले या तक्रार नोंदवून घेण्यासाठी अडून बसल्या. अखेर पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.

नेमकं प्रकरण काय?

मेधा खोले यांना गौरी-गणपतीदरम्यान सोवळ्यातील स्वयंपाक करणारी सुवासिनी ब्राम्हण महिला हवी होती. 2016 मध्ये निर्मला कुलकर्णी नावाची एक स्त्री त्यांच्याकडे आली. आपल्याला कामाची गरज असल्याचं सांगत त्यांनी खोले यांच्याकडे स्वयंपाकाचं काम मागितलं. त्यावेळी खोले यांनी निर्मला यांच्या घरी जाऊन ही महिला ब्राम्हण आहे की, नाही याची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी तिला स्वयंपाकाचं काम दिलं.

नुकताच पार पडलेल्या गौरी-गणपतीतही निर्मला यांनीच मेधा खोले यांच्या घरी सोवळ्यातील नैवेद्याचा स्वयंपाक केला होता. पण काल (बुधवार) निर्मला ही ब्राम्हण नसल्याची माहिती खोले यांना समजली. त्यामुळे पुन्हा शाहनिशा करण्यासाठी खोले या निर्मला यांच्या घरी गेल्या. त्यावेळी आपलं नाव निर्मला यादव असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर दोघींमध्ये बराच वाद झाला. यावेळी आपल्याला महिलेनं दमदाटी आणि शिवीगाळ केल्याची तक्रार मेधा खोले यांनी सिंहगड पोलिसात केली आहे.