पुणे : पुण्यातील जम्बो हॉस्पिटल घाईघाईने सुरु करणं प्रशासनाच्या कसं अंगलट आलं होतं. हे सर्वानी उघड डोळ्यांनी पाहिलं. आता कोरोना रुग्णांची संख्या मंदावताना देखील अगदी तशीच अतिघाई प्रशासनाकडून सुरु आहे. पुणे आणि पिंपरी जम्बो हॉस्पिटलमधील पन्नास टक्के स्टाफची कपात करण्याच्या प्रशासनाने सूचना केल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी ही सुरु झाली आहे. डिसेंबर आणि जानेवारीत कोरोनाची सेकंड फेज येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी वर्तवली असताना, प्रशासन पुणेकरांच्या जीवाशी खेळू पाहत आहे.
पिंपरी चिंचवडच्या जम्बो हॉस्पिटलमधील कोरोना योध्यांना अचानक कामावरून कमी करण्यात आल आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या परिचारिकांनी आजवर अनेक कोरोना बाधितांची कोरोनातून मुक्तता करण्यासाठी जीवाची बाजी लावली. पण आज त्याच कोरोना योध्यांना प्रशासनाने रस्त्यावर आणलं आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ऑगस्ट अखेरीस जम्बो हॉस्पिटलची उभारणी झाली. तेव्हा जिल्ह्यात कोरोनाने कहर माजवला होता. सप्टेंबरच्या सुरुवातीला दिवसाला साडे तीन हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत होते. पण आता कोरोना रुग्णांची संख्या मंदावून दिवसाला हजाराच्या आत येऊन ठेपली आहे. म्हणूनच प्रशासनाने जम्बो हॉस्पिटलला पन्नास टक्के स्टाफची कपात करण्याची सूचना केली आहे.
पुणे पिंपरी
डॉक्टर 119 129
परिचारिका 200 222
अन्य कर्मचारी 127 300
एकूण स्टाफ 446 651
बेड्सची संख्या 600 800
उपचार सुरु असलेले रुग्ण 310 170
पिंपरी चिंचवड जम्बो हॉस्पिटलमधील बेड्सची मर्यादा, आज उपचार घेत असलेली संख्या आणि कर्मचारी हे पाहता प्रशासनाला जंबो हॉस्पिटल चालवत असलेल्या खाजगी संस्थेला अधिकचे पैसे मोजावे लागत होते. म्हणून पन्नास टक्के स्टाफची कपात करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. त्यामुळं पुणे जम्बो हॉस्पिटलकडून ही स्टाफ कपात होणार हे उघड आहे.
'गरज सरो, वैद्य मरो" हे पिंपरी चिंचवड जम्बो हॉस्पिटलच्या परिचारिकांनी प्रत्यक्षात अनुभवले आहे. पण पुणे प्रशासनाचं हे धोरण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. कारण अनेक तज्ज्ञांनी डिसेंबर आणि जानेवारीत कोरोनाची लाट येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.
Pune Naidu Hospital | पुण्यातील नायडू रुग्णालय इतरत्र हलवण्याची तयारी?