Pune News : पुण्यातील ओंकारेश्वर (Pune News) मंदिरात विद्यार्थी आणि देवस्थान विश्वस्तांमध्ये वाद झाला. नारायण पेठेतील अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि मंदिर देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये हा वाद झालाय. या वादाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा वाद नेमका कशामुळे झाला?, याच चूक कोणाची?, असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे. 


नेमकं काय घडलं?


एमपीएससी अर्थात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विध्यार्थी आणि पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराचे ट्रस्टी यांच्यातील वादाचा हा व्हिडीओ आहे. या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रोजच गर्दी असते. पण शेजारीच असणाऱ्या अभ्यासिकेतील विध्यार्थी आणि विद्यार्थिनीचा काही दिवसांपूर्वी मंदिरातील व्यक्तींसोबत वाद झाला आणि इथल्या शांततेला गालबोट लागलं. देवस्थानने याच मुला-मुलींचा त्या दिवशीचा वावर सीसीटीव्हीच्या दृश्यातून समोर आणला आहे. मात्र वादाचा सीसीटीव्ही कोणालाही दाखवण्यात आला नाही आहे. 


पुण्यातील हे ओंकारेश्वर मंदिर आणि त्यालगत अनेक अभ्यासिका आहेत. नारायण पेठेत अशा अनेक अभ्यासिका असल्यानं आणि मंदिर परिसरात शांतता असल्यानं मुला-मुलींची इथं अभ्यासाला पसंती असते. मात्र जो वाद व्हिडिओमधून दिसतोय, तो नेमका का झाला? याबाबत विद्यार्थी आणि मंदिरातील कोणी व्यक्ती बोलायला तयार नाहीत. पोलिसांकडे या प्रकारची कोणी तक्रार दिली नाही आहे. 


हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुण्यात नक्की काय चाललंय? असा प्रश्न विचारला जातोय? मंदिरात विद्यार्थ्यांनी अभ्यासाला नक्की यावं पण त्यांनी भान हरवू नये. कारण वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ही मुलं आणि मुली नक्की मंदिर परिसरात काय करत होते. असा प्रश्न दबक्या आवाजामध्ये दर्शनासाठी आले भाविकांना पडला आहे. 


पुण्यात शिक्षणासाठी अथवा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मुला-मुलींना त्यांचे आई-वडील मोठ्या अपेक्षेने पाठवतात. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुला-मुलींवर मोठा खर्च ही करतात. या मुला-मुलींनी ही पालकांच्या विश्वासाला पात्र राहावं, असं अपेक्षित असते. त्याबरोबरच ते ज्या पार्श्वभूमीतून आलेत, त्याला इथल्या स्थानिकांनी ही समजून घ्यावं, अशी या मुलांची ही अपेक्षा असते. या दोन्ही बाजूंनी हा समजूतदारपणा दाखवला तरच असे प्रसंग टाळता येण्याची शक्यता आहे. 


पुण्यात सध्या मारहाणीच्या घटना आणि गुन्हेगारी वाढत आहेत. त्यावर आळा घालण्याचा प्रयत्न पुणे पोलीस करत आहेत. मात्र यातच तरुणांनीदेखील पुढाकार घेण्याची गरज आहे. मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी तरुणांनीही राग अनावर न होऊ देता. संयम राखणं गरजेचं आहे. तरच गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल, असं नागरिक सांगतात. 


हेही वाचा-