पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आज सकाळी 11 वाजता माजी न्यायामूर्ती बी जी कोळसे-पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाचं आमंत्रण कोणतही कारण न देता महाविद्यालय प्रशासनाने रद्द केलं.
बी जी कोळसे-पाटील राज्यघटना 1950 ते 2018 या विषयावर फर्ग्युसन महाविद्यालयात व्याखान देणार होते. फर्ग्युसन महाविद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्रसिंह परदेशी यांनी पत्र पाठवून कोळसे पाटील यांना आमंत्रित केलं होतं. मात्र कोणतही कारण न देता महाविद्यालय प्रशासनानं व्याख्यान रद्द केल्याचा आरोप कोळसे-पाटलांनी केला. प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यी संघटनांकडून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
फर्ग्युसन महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून चालवलं जातं. महाविद्यालयात कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देण्याचे अधिकार डेक्कन एज्युकेशन सोसायटीला आहेत, महाविद्यालयाच्या प्राचार्यांना नाहीत अशी माहिती डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी दिली.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापन आणि प्राचार्य यांच्यातील विसंवादामुळे बी जी कोळसे पाटलांच्या व्याख्यानाला परवानगी दिली गेल्याचं कुंटेंनी विद्यार्थ्यांना सांगितल.
महाविद्यालय प्रशासनानं व्याख्यान रद्द केल्यानं कोळसे पाटील यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात भाषण केलं. त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विरोध किरकोळ विरोध झाला. मात्र काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात तणाव निर्माण झाला होता.