पुणे : विकेंड आला की तरुणाई पार्टी आणि लाँग ड्राईव्हचे प्लॅन आखतात. मात्र पुण्यात अशीच एक पार्टी आणि रेसिंगचा नाद जीवावर बेतला आहे.

 
मध्यरात्रीपूर्वी पार्टी आणि नंतर कार रेसिंगच्या नादानं पुण्याहून निघालेल्या कृतिका नांदलस्कर या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. आंबेगावात शुक्रवारी मध्यरात्री कृतिका आणि तिचे एकूण 7 मित्र पार्टी संपवून लाँग ड्राईव्हला निघाले.  दोन्ही आय ट्वेंटी कार हाय वेवर निघाल्या. काही मिनिटात रेसिंगचं भूत डोक्यात गेलं आणि वेगानं घात केला.

 

 

आय ट्वेंटी कारच्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला, तर काही जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही वाहन चालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

 
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताची मालिका सुरु आहे. त्यात आणखी एका अपघाती मृत्यूची भर पडली आहे. कारचा वेग एवढा होता की बॅरिकेट्सही तुटले. कारकडे पाहिलं तरी या अपघाताची तीव्रता सहज लक्षात येईल.

 
विकेंडच्या निमित्तानं पार्टी आणि लाँग ड्राईव्हवर जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र मौज मजेत आपला जीव जाणार नाही याकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एक चूक जीवघेणी ठरु शकते.