पुणे : पुण्यातील व्यवसायिक गौतम पाषाणकर हे त्यांना एका बड्या राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीकडून त्रास दिला जात असल्यानं घर सोडून निघून गेल्याची दुसरी तक्रार पाषाणकर यांच्या कुटुंबियांकडून आज पोलिसांकडे देण्यात आली आहे. यामुळे बेपत्ता व्यवसायिक गौतम पाषाणकर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
मागील बुधवारी गौतम पाषाणकर अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली होती . त्याचबरोबर पाषाणकर यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेली तीन पानांची सुसाईड नोटही कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली होती. मात्र त्या सुसाईड नोटची तीन नाही तर चार पानं असून चौथ्या पानावर आर्थिक कारणांनी दिल्या जात असलेल्या त्रासामुळे आपण पुण्याच्या बाहेर निघून जात असल्याचं गौतम पाषाणकर यांनी लिहून ठेवलायचा दावा पाषाणकर यांचा मुलगा कपिल पाषाणकर यांनी केलाय . त्याचबरोबर या प्रकरणात पुणे पोलिसांवर दबाव असू शकतो असंही त्यांनी म्हटलंय .
पाषाणकर यांची गाड्यांची डीलरशीप, गॅस एजन्सी आणि इतरही अनेक व्यवसाय आहेत. बुधवारी (21 ऑक्टोबर) लोणी काळभोर इथल्या गॅस एजन्सीमधे जाऊन गौतम पाषाणकर हे शिवाजी नगर मधील त्यांच्या कार्यालयात परत आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरकडे एक लिफाफा दिला आणि ड्रायव्हरला तो घरी द्यायला सांगितला. त्यानंतर गौतम पाषाणकर हे चालत पुणे विद्यापीठाच्या दिशेनं गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं आहे. तेव्हापासून पाषाणकर बेपत्ता आहेत. पाषाणकर यांचं नक्की काय झालं याचा पोलिस तपास करत आहेत.
गौतम पाषाणकर हे कोणाला आढळल्यास त्यांनी कपिल पाषाणकर ( 9822474747) किंवा शिवाजीनगर पोलिस ठाणे (020-25536263) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.