पिंपरी चिंचवड : पोटच्या दोन मुलींच्या अंगावर ट्रक घालून हत्या करत बापाने त्याच ट्रक खाली आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना पुण्याच्या मावळमध्ये मध्यरात्री एक वाजता घडली. मोठ्या मुलीचे प्रेमसंबंध सुरू आहेत आणि ती व्हॉट्सअॅपवर त्या मुलाशी संवाद साधते. या संशयावरून अख्ख कुटुंब संपवण्याचा प्रयत्न बापाने केला. सुदैवाने लहान मुलगी आणि पत्नी यातून बचावले आहेत. भरत भराटे असं निर्दयी मृत बापाचं नाव आहे. तर 18 वर्षीय नंदिनी आणि 14 वर्षीय वैष्णवी या दोन्ही मुलींची त्याने हत्या केलीये. या घटनेपूर्वी बापाने एक चिट्टीही लिहून ठेवली आहे. त्यात मुलीच्या प्रेमसंबंधांचा उल्लेख करत अख्ख कुटुंब संपवत असल्याचं नमूद आहे.
मुळचे सोलापूर जिल्ह्यातील पण सध्या मावळ तालुक्यातील इंदोरी गावात भराटे कुटुंबीय राहत होते. इथेच ते एका छोट्याशा घरात राहत होते. घर गावापासून दूर असून तिथून शंभर मीटर अंतरावर नातेवाईकही राहतात. वडील ट्रक चालवायचे तर आई देखील लगतच एका ठिकाणी काम करायची. तीन मुली आहेत, मात्र कोरोनामुळे शाळांना सुट्टी असल्यानं त्या घरीच असतात. शनिवारच्या (18 एप्रिल) दुपारी मोठी मुलगी नंदिनी मोबाईलवर चॅटिंग करत होती. व्हॉट्सअॅपवर ती एका मुलाशी संवाद साधत असल्याचं तिच्या वडिलांनी पाहिले. तेव्हा भरतने मुलीला मारहाण केली. सायंकाळी सात वाजता मुलींची आई कामावरून आली, तेव्हा पुन्हा भांडणं झाली. मुलगी वाईट वळणावर कशी गेली यावरून बाप चिंतेत होता. रात्री सर्वांची जेवणं झाली, नंतर भरत एका कागदावर काहीतरी लिहित होता. आईने विचारले तर तिच्यावर तो डाफरला. नंतर त्याच कागदावर आईला जबरदस्तीने सही करायला सांगितलं. पती चिडलाय हे पाहून आईनेही सही केली.
त्यानंतर साडेअकरा वाजता सगळे झोपी गेले. भरत काही वेळाने उठला आणि दोन मुलींना घेऊन घराबाहेर पडला. पण नेहमीप्रमाणे बाहेर वाहनं आहेत का हे पाहत असावा, त्यातच उन्हाळा असल्याने तो मध्यरात्री उठून बाहेर बसायचा. मुली ही कधीकधी सोबत असायच्या. तसंच यावेळी ही मुलींना तो बाहेर घेऊन गेला असावा असा आईचा समज झाला. पण काहीवेळाने ट्रकचा आवाज आला, म्हणून आई घराबाहेर आली. तेव्हा दोन्ही मुली रस्त्यावर झोपलेल्या आणि त्यांचा बाप ट्रकच्या स्टेरिंगवर दिसला. अहो, काय करताय असे आईने विचारलं. बापाने लहान मुलीसह तू ही इथे येऊन झोप, असं धमकावलं. पण ती लहान मुलीला घेऊन तिथून लगत राहणाऱ्या नातेवाईकांच्या दिशेने धावली. नातेवाईकांना घेऊन तिथं पोहचेपर्यंत उशीर झाला होता. काही कळण्याआधी, दोन्ही मुली आणि पतीचा मृतदेह डोळ्यासमोर होता. सुदैवाने लहान मुलगी आणि पत्नी बचावल्या आहेत.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांना याची कल्पना देण्यात आली. ते घटनास्थळी आले तेव्हा दोन मुलींचे मृतदेह जवळजवळ होते, तर बापाचा मृतदेह त्यांच्यापासून आठ ते नऊ फुटांवर होता. नेमकं काय घडलं असेल हे पोलिसांच्याही लक्षात येत नव्हतं. आईने घडला प्रकार सांगितला, त्यानुसार चिट्ठी हाती लागली. त्यात मुलगी वाईट वळणावर लागली आहे, ती व्हॉट्सअॅपवर मुलाशी बोलते. म्हणून आम्ही अख्ख कुटुंब जीवन संपवत आहोत. यास कोणाला जबाबदार धरू नये असं त्यात नमूद होतं. हे वाचून पोलिसांनाही धक्का बसला. केवळ मुलगी व्हॉट्सअॅपवर एका मुलाशी बोलते म्हणून इतकं टोकाचं पाऊल उचलण्यात आल्याने संतापही व्यक्त केला जातोय.