पुणे उसाच्या थकीत असलेल्या एफआरपीच्या मागणीसाठी काढण्यात आलेलं स्वाभिमानीचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय. साखर आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर खासदार राजू शेट्टींनी ही घोषणा केली आहे.


एफआरपीप्रमाणं दर न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाईची केली जाणार असल्याचं आश्वासन साखर आयुक्तांनी दिलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. दरम्यान जर आश्वासनपूर्ती झाली नाही, तर आमरण उपोषण करु, असा इशारा खासदार राजू शेट्टींनी दिला आहे.

दरम्यान उसाच्या थकीत असलेल्या एफआरपीच्या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज पुण्यातल्या साखर संकुलावर मोर्चा काढला होता. या मोर्चात राज्यभरातून हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काढण्यात आलेल्या या मोर्चात योगेंद्र यादवसुद्धा सहभागी झाले होते. यात राज्यभरातून हजारो शेतकरी सहभागी झाले . मात्र, साखर संकुलापासून काही अंतरावर हा मोर्चा पोलिसांकडून अडवण्यात आला. अलका चौक ते पुणे साखर आयुक्त कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग होता.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेलं लेखी आश्वासन -

  • एफआरपी प्रमाणे दर न देणाऱ्या 39 साखर कारखान्यांची सुनावणी पुर्ण झाली आहे. त्या कारखान्यांवर कारवाईची सर्टीफीकेट मंगळवारी देण्यात येणारल आहे

  • उरलेल्या एफआरपी प्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांची सुनावणी येत्या तीन दिवसांत पुर्ण करणार आणि त्या कारखान्यांवर कारवाई करण्याची सर्टीफीकेटस साखर आयुक्त शेतकऱ्यांना देणार

  • सर्टीफीकेट्स घेऊन शेतकऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांना दिल्यानंतर त्या कारखान्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरु होणार

  • ज्या कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिलेली नाही त्यांच्यावर येत्या सात दिवसांत फौजदारी कारवाई करण्याचे लेखी आश्वासन