पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेल्या वाल्मिक कराडचे (Walmik Karad) अनेक काळे कारनामे समोर आले आहेत. वाल्मिक कराडने (Walmik Karad) अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना देखील फसवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पंढरपूर मध्ये वाल्मिक कराडकडे काही शेतकऱ्यांनी ऊस हार्वेस्टिंग करणाऱ्या मशीनसाठी अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातील काही शेतकऱ्यांची देखील वाल्मिक कराडने (Walmik Karad) फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी त्याने शेतकऱ्यांकडून प्रत्येकी आठ-आठ लाख रूपये घेतली असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली असल्याची माहिती समोर आली आहे. 


परळीतील वाल्मिक कराड (Walmik Karad) याने ऊसतोडणी यंत्र (हार्वेस्टर) अनुदानाच्या आमिषाने फसवणूक केलेल्या बारामतीतील शेतकऱ्यांनी काल(गुरुवारी) खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांना सर्व घटना सांगितली. हार्वेस्टर घेतलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी वाल्मिक कराडने प्रत्येकी शेतकऱ्यांकडून आठ-आठ लाख रुपये घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र, या शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही त्याचबरोबर पैसेही परत केले नाहीत, अशी तक्रार फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी काल सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन केली. 


सुप्रिया सुळेंनी फिरवला फोन


शेतकऱ्यांनी सर्व घटना सांगितल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना फोन केला. त्यांना या प्रकरणाची चौकशी करत शेतकऱ्यांना न्याय द्या, अशी मागणी देखील केली. केंद्र सरकारच्या वतीने ऊसतोडणी मशिनसाठी देण्यात येणारे 40 टक्के अनुदान मिळवून देतो, असे सांगून वाल्मिक कराड याने ही फसवणूक केली असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


बारामती तालुक्यातील तरडोली येथील शेतकरी व हार्वेस्टर मालक रामचंद्र विठ्ठल भोसले यांनी या फसवणूक प्रकरणाची माहिती खा. सुळे यांच्यासमोर माध्यमांना दिली. भोसले यांच्या म्हणण्यानुसार, मुंडे यांचे कराड हे निकटवतीय असून, ते तुम्हाला प्रत्येकी ३६ लाख रुपये अनुदान मिळवून देतील, त्यासाठी प्रत्येकी आठ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले होते. पैसे दिल्यानंतर शेतकरी अनुदान कधी मिळणार याची कराडकडे चौकशी करत होते. प्रत्येक वेळी पुढच्या महिन्यात होईल, अशी आश्वासने वाल्मिक कराडकडून वारंवार देण्यात येत होती, अशी माहिती देखील त्यांनी सुळेंना दिली आहे.