Pune Bypoll election : भाजपचे (BJP) आमदार मुक्ता टिळक (MUkta Tilak) आणि आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा (bypoll election) मतदारसंघासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. येत्या 26 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेमुळे अवैध बाबींवर तक्रार आणि कारवाई करणं सोपं होणार आहे.
जिल्ह्यातील 205- चिंचवड आणि 215- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने करता येतील. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन ‘सी-व्हिजिल’ (cVIGIL) ॲप मोफत डाऊनलोड करता येते.
अॅप कसं काम करतं?
ॲप सुरु करुन त्यामध्ये छायाचित्र, व्हिडीओ किंवा ऑडिओ तयार करुन पोस्ट केल्यांनतर तक्रारीची नोंद होते. तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनीटामध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात तक्रारीचे स्वरुप आणि संख्येनुसार हा वेळ कमी-अधिक होतो. तक्रारीचे निरसन झाल्यानंतर तक्रारदारास ॲपद्वारे संदेश जातो. याशिवाय आचारसंहिता कक्षाकडे देखील आचारसंहिता भंगाबाबत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात, अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नोंद झालेल्या 52 तक्रारींचं निरसन करण्यात आलं आहे, अशी माहितीदेखील इथापे यांनी दिली.
पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून कसब्यात आणि चिंचवडमध्ये इच्छूक कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यात अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. विरोधकांकडून कसब्यात विकास करणारा पक्ष हवा अशा आशयाचे बॅनर झळकले होते. त्यानंतर ते बॅनर काढण्यात आले. या सगळ्यात वादावादी होण्याची शक्यता असते आणि त्यातून शांतता भंग होते. सोबतच निवडणूकीसाठी मतदारांना वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवलं जातं,हे सगळं टाळण्यासाठी या अॅपची सुविधा देण्यात आली आहे.