पुणे: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा आजच्या शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये कौतुक करण्यात आलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील त्यांच्या कौतुक केलं आहे, याबाबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, एखादं चांगल काम केलं असेल तर कौतुक करायला काय हरकत आहे. राजकारण म्हणजे हातात भाले तलवारी घेऊनच उभं राहील पाहिजे असं काही नाही. ज्या मुख्यमंत्र्यांचा कौतुक केले जात आहे, त्या मुख्यमंत्र्यांकडून सगळ्यांसाठी सारख्या गोष्टींची अपेक्षा आहे, असं देखील यावेळी अंधारे म्हणाल्या आहेत.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले वाडा येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. यावेळी त्यांना याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी उत्तरे दिली. यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, या निमित्ताने राज्य सरकारकडे अपेक्षा आहे. ते महिलांच्या प्रश्नांकडे पाहतील, ज्या महिला खऱ्या अर्थाने पीडित आहे अशाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असं यावेळी अंधारे म्हणाल्या आहेत.
लोकांना निवडणुकीत समर्थन दिलं आणि आत्ता...
मुंब्रा येथे मराठी बोलायचं म्हणून सांगितल्यानंतर एका मराठी तरूणाला माफी मागायला लावली, या घटनेबाबत अंधारे प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, मराठी भाषेच्या अस्मितेचा विषय नक्की आहे. पण आधी गुजराती लोकांना समर्थन असणाऱ्या लोकांना निवडणुकीत समर्थन दिलं. आत्ता मराठी लोकांवर अन्याय होत आहे असं म्हणण्यात काय अर्थ आहे, असं म्हणत अंधारे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
पक्षातील पाच नगरसेवक भाजपमध्ये...
उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या, पाच नव्हे तर तीन नगरसेवक असून त्यांची आज पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आली आहे. जेव्हा आमच्या पक्षातील आमदार असतात तेव्हा सत्ताधारी पक्षांकडून जाणून बुजून निधी दिला जात नाही. अशा परिस्थितीमध्ये काम कसं करायचं, असा प्रश्न असतो. पण काही लोक हे संकट काळात देखील सोबत असतात. पण काहीना संघर्षाचा काळ नको असतो, म्हणून ते सत्तेत सहभागी होतात. त्यामुळे आत्ता जे गेले त्यांना शुभेच्छा असं अंधारे म्हणाल्या आहेत.