मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार  (Rohit Pawar) यांची बारामती अॅग्रोच्या (Baramati Agro Ltd) संबंधित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (ED Action On Rohit Pawar In PMLA Case) ही कारवाई केली असून रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. 


ईडीने रोहित पवारांशी संबंधित बारामती अॅग्रो संबंधित औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्यातील 161.30 एकरची संपत्ती जप्त केली आहे. त्यामध्ये जमीन, शुगर प्लंट, साखर कारखान्याची इमारत आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.


 






रोहित पवारांवर आरोप काय? (ED Action On Baramati Agro)


कन्नड सहकारी साखर कारखाना डबघाईला आल्यानंतर राज्य सहकारी बँकेने त्याचा लिलाव केला. हा कारखाना 50 कोटी रुपयांमध्ये रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो लिमिटेडने खरेदी केला होता. या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी ईडीने बारामती अॅग्रोची चौकशी केली. या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकातले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.


बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या कंपन्या लिलावात सहभागी आहेत. हायटेक कंपनीने लिलावासाठी पाच कोटी रूपयांची रक्कम भरली होती. ती रक्कम बारामती अॅग्रोकडून घेतल्याची चर्चा आहे. विविध बँकांतून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम बारामती अॅग्रोने कारखाना खरेदीसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


रोहित पवारांची दोन वेळा चौकशी


बारमती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. आमदार रोहित पवार यांच्याकडे बारमती अॅग्रो कंपनीची मालकी आहे. बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती.


बारामती अॅग्रो प्रकरणी आमदार रोहित पवार यांची या आधी दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. आता ईडीने कन्नड कारखान्याशी संबंधित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. 


ही बातमी वाचा :