Duplicate Amitabh Bachhan Shashikant Pedwal : खरेखुरे बिग बी अमिताभ बच्चन समजून अनेक लोक माझ्या मागे धावतात. गर्दी करतात. फोटो काढतात. तेव्हा मला छान वाटतं. मात्र जेव्हा त्यांना मी अमिताभ बच्चन नाहीतर त्यांच्यासारखा दिसणारा माणूस आहे, असं कळतं तेव्हा लोक मला डुप्लिकेट अमिताभ बच्चन म्हणतात. खरंतर एखादा माणूस जगात एकच असतो, त्याच्यासारखे दिसणारे किंवा त्यांचा पेहराव करणारे अनेक असतात. मात्र जेव्हा मला 'डुप्लिकेट' अमिताभ बच्चन नावाने संबोधलं जातं त्यावेळी मला वाईट वाटतं. मी त्यांना मला प्रति अमिताभ बच्चन म्हणा असं सांगतो, असं पुण्यातील हूबेहूब अमिताभ बच्चन सारखे दिसणारे शशिकांत पेडवाल सांगतात.


अनेक नेते आणि अभिनेत्यांचे वेश केलेले किंवा हूबेहूब एखाद्या अभिनेत्यासारखे दिसणारे अनेक लोक आपण पाहतो. अनेकांचे चेहरे जुळतात तर अनेक लोक मोठे चाहते असल्याने त्यांची स्टाईल कॉपी करत असतात. यातच अमिताभ बच्चन यांची शैली कॉपी करणारे भारतातच नाही तर विदेशात देखील आहेत. तसेच एक पुण्यात देखील आहे. शशिकांत पेडवाल असं त्यांचं नाव आहे. मागील तीस वर्षांपासून ते प्रति अमिताभ बच्चन म्हणून ओखळले जातात. ते घराबाहेर निघाले की अमिताभ बच्चन समजून लोक त्याच्या भोवती घोळका करतात.


बालमित्रांमुळे अमिताभ बच्चनसारखा झालो...


शशिकांत पेडवाल हे मूळचे धुळ्याचे आहे. धुळ्यातच त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. दहावीत असताना त्यांच्या मित्रांनी त्यांना अमिताभ बच्चन म्हणून चिडवायला सुरुवात केली. गावातील अनेक लोक त्यांना 'तू अमिताभ बच्चन सारखा दिसतो', असं सांगायचे. 30 वर्षांपूर्वी अमिताभ बच्चनची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ होती. त्यामुळे शशिकांत यांना देखील अमिताभ बच्चन म्हटलेलं आवडायला लागलं. मात्र फक्त आवडून चालणार नव्हतं तर त्यांच्या सारखं वागावं देखील लागणार होतं. मित्रांना सोबत घेत शशिकांत यांनी अमिताभ बच्चन यांच्यासारखे केस कापले. त्यानंतर बच्चन ज्या प्रकारचे कपडे परिधान करायचे तसे कपडे विकत घेतले. एवढ्यावर सगळं थांबलं नाही तर त्यांचा नाद वाढत गेला. त्यांनी स्वत:च्या आवाजावर काम केलं. खर्जा स्वर कसा काढायचा याचा तसेच आवाजाचा आणि भाषेच्या लहेजाचा अभ्यास केला. शिवाय त्यांच्या देहबोलीचा देखील अभ्यास केला. या सगळ्या परिश्रमानंतर त्यांना प्रति अमिताभ म्हणून त्यांच्या मित्रपरिवारातच नाही तर बाहेर देखील ओळख मिळाली. आता ते पुण्यातील औंधमधील आयटीआयमध्ये शिक्षक आहेत. पुण्यातदेखील त्यांना चांगली ओळख मिळाली आहे. 






 


जेव्हा खऱ्या अमिताभ बच्चन यांना भेटले
2011 साली ते बिग बी अमिताभ बच्चन यांना भेटले. तेव्हा त्यांनी त्याचेच काही फोटोशूट केलेले फोटो अमिताभ बच्चन यांना दाखवले आणि तुमच्या सगळ्या फोटोंचा संग्रह केला आहे, असं खोटं सांगितलं. त्यावेळी असा एक एवढे फोटो एकत्र करणारा चाहता पाहून अमिताभ बच्चन अवाक झाले होते. भेटीच्या शशिकांत यांनी अमिताभ बच्चनसारखे कपडे परिधान केले नव्हते शिवाय फार मेकअपदेखील केला नव्हता. मात्र या वेड्या चाहत्याचा नाद पाहून अमिताभ बच्चन यांनी शशिकांत यांना जवळ बसवलं आणि माझा जुळा भाऊच दिसतो असं म्हटलं. त्यावेळी शशिकांत यांच्या ह्रदयाचे ठोके वाढले होते, अंग थंडगार पडलं होतं आणि अंगावर चर्रकन काटासुद्धा आला होता, असं शशिकांत सांगतात. 







 
KBC चा सेट अन् दोन अमिताभ बच्चन...
कोरोनाच्या काळात अनेकांना मानसिक आधाराची गरज होती. त्यावेळी त्यांनी अमिताभ बच्चनचा आवाज काढून अनेकांना आधार दिला. शासनाची परवानगी घेत त्यांनी स्वत:चा एक व्हिडीओ व्हायरल केला. त्यात माझ्याशी तुम्हाला बोलायचं का? असा प्रश्न विचारला होता आणि नंबर दिला होता. अमिताभ बच्चन यांच्या नावाचा उल्लेखही त्यांनी या व्हिडीओत केला नव्हता. काहीच दिवसात त्यांना अनेकांना फोन करावे लागले. मृत्यूशी झुंज देत असलेल्या अनेकांना अमिताभ बच्चन यांच्याशी बोलत असल्याचं वाटत होतं आणि हळूच अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटत होतं. त्याचा हाच व्हिडीओ अखेर अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यामातून पोहचला आणि रुग्णांना आपला आवाज काढून आधार देत असल्याचं बच्चन यांना कळलं. त्यावेळी KBC चं सीझन सुरु होतं. KBC च्या टीमने शशिकांत यांना रितसर निमंत्रण देऊन सेटवर भेटायला बोलवलं. कोरोना रुग्णासाठी करत असलेल्या कामाचं बच्चन यांनी कौतुक केलं होतं.


 






शिवाय पुण्यातील सिपला कॅन्सर रुग्णालयात देखील ते महिन्यातून एक दिवस मृत्यूच्या दारात असलेल्या सगळ्यांना हसवायला जातात. येत्या काळात त्यांना सामाजिक काम करायचं आहे. पेशाने शिक्षक असले तरीदेखील त्यांनी त्यांचा छंद जोपसला आहे त्याच छंदाचा ते दुसऱ्यासाठी काही उपयोग होऊ शकतो का? याचा विचार करतात. येत्या काळात त्यांना स्वत:चं वृद्धाश्रम सुरु करायचं आहे आणि त्यांची सेवा करायची असल्याचं ते सांगतात.