Pune Bhide Bridge News: पुण्यात गेले तीन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे तीन दिवस मुसळधार पाऊस पडला. पुण्याजवळील काही धरणात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातदेखील 100 टक्के पाणीसाठा झाल्याने सायंकाळी 4 वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 18 हजार 491 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. मुठा नदीत हा विसर्ग केल्यामुळे पुण्यातील डेक्कन परिसरातील बाबा भीडे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यासोबतच नदी पात्रातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. नदीपात्रात असलेल्या गाड्या आणि ढोल ताशापथकांचे मंडपदेखील पाण्याखाली गेले आहे. हे सगळं दृष्य पाहण्यासाठी झेड ब्रीजवर पुणेकरांना चांगलीच गर्दी केली आहे आणि सोबतच पावसाचा आनंद लुटत आहे.
बाबा भिडे पुल पाण्याखाली
बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला की पाऊस झाला असा अंदाज वर्षानुवर्षे पुणेकर वर्तवतात. गेले तीन दिवस पुण्यात संततधार पाऊस पडल्याने खडकवासला धरण 100 टक्के भरलं. धरणातील पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आलं. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. भिडे पूल पाण्याखाली गेला म्हणजे पुण्यात पाण्याचा प्रश्न मिटला असं समजल्या जातं. काही दिवसांसाठी या पुलावरुन वाहतुक बंद ठेवण्याल आली आहे आणि नदी पात्रातून प्रवास न करण्याचं आवाहन देखील प्रशासनांनी पुणेकरांना केली आहे.
पुण्याजवळील सर्व धरणात चांगल्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100 टक्के भरले असल्याने पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग करण्यात येणार आहे.भामा आसखेड प्रकल्पातून भामा नदी पात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. मुळशी धरण जलाशय पातळीत देखील वाढ झाली आहे.
राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ (vidarbha) आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.