मुंबई: मुंबईतल्या तुफान पावसामुळे कधीही न थांबणारा एक्स्प्रेस वेही हडबडला आहे. कारण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक थांबवण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला आहे.

महामार्ग पोलिसांकडून मुंबईला जाण्यासाठी मार्ग बंद करण्यात येत आहे. एक्स्प्रेस वेवरील कुसगाव आणि उर्से टोलनाक्यावर वाहतूक बंद करणार आहेत. मुंबईवरुन आलेल्या निर्देशानुसार महामार्ग पोलिसांनी मुंबईच्या दिशेचा द्रुतगती मार्ग 6:30 पासून बंद केला.

नवी मुंबईत बाहेरुन येणाऱ्या वाहनांना बंदी

नवी मुंबई वाहतूक विभागाकडून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बाहेरील वाहनांना शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पुणे आणि गोवा मार्गाने नवी मुंबईत येणाऱ्या वाहनांना शहराबाहेर थांबवण्यात येत आहे. नवी मुंबई आणि मुंबईत वाहतूक कोंडी झाल्यामुळे बाहेरुन येणारी वाहनं परत पाठवली जात आहेत. नवी मुंबईत राहणाऱ्यांनाच केवळ सोडलं जात आहे.

जेएनपीटी बंदरामधून मोठ्या प्रमाणात जे कंटेनर निघतात त्यांनाही बंदी करण्यात आली आहे. नवी मुंबईतील सायन - पनवेल हायवे, ठाणे - बेलापूर हायवे, शिळफाटा मार्ग या सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी आहे.

तुफान पावसामुळे मुंबईतील सर्व लोकल मार्ग, रस्ते मार्ग आणि हवाई मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे चहूबाजूंनी मुंबईकरांची कोंडी झाली आहे. त्यातच आता मुंबई- पुणे महामार्गही रोखण्यात आला आहे.

मुंबईत येणारे महामार्ग रोखले

  • मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कुसगाव, उर्से टोलनाक्याजवळ रोखली

  •  जुना हायवे NH 4 पण बंद

  • नाशिककडून मुंबईला येणारी वाहतूक घोटी टोल नाक्याजवळ थांबवली