NCP : अखेर शरद पवारांनी (Sharad Pawar) भाकरी फिरवलीच आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करत असल्याची घोषणा केली. अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ही मोठी घोषणा केली. शरद पवारांच्या राजीनाम्या नाट्यानंतर याच दोन नावांची चर्चा रंगली होती. त्यावरच आज शरद पवारांनी शिक्कामोर्तब केले आहे. राष्ट्रवादी पक्षाला कार्यकारी अध्यक्ष म्हणून एका नेत्याची निवड करता आली असती मात्र त्यांनी दोघांची निवड केली. राष्ट्रवादीला खरंच दोन कार्यकारी अध्यक्षांची गरज आहे का? किंवा राष्ट्रवादीने दोन नेत्याची निवड का केली?, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.


राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात की, दोन कार्यकारी अध्यक्षांची निवड करण्यामागे अनेक कारणं आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकारी म्हणून एकट्या सुप्रिया सुळे यांची निवड केली असती तर राजकीय वारसदार म्हणून त्यांना जाहीर केलं आहे, असा त्याचा अर्थ निघाला असता. असा कोणताही अर्थ निघू नये यासाठी शरद पवारांनी दोन कार्यकारी अध्यक्षांची घोषणा केली आहे. 


महत्वाच्या नेत्यांकडे जबाबदारी सोपवणार!


महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या नेत्यांकडे येत्या काळात महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. तुरुंगातून बाहेर आल्यापासून अनिल देशमुख अधिक सक्रिय दिसत आहेत. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या तगड्या नेत्यांच्या फळीवर नवी जबाबदारी देण्याची तयारी राष्ट्रवादी करत आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व निवडताना शरद पवारांनी सामुहिक नेतृत्व निवडलं आहे. चांगल्या नेत्यांची फळी शरद पवारांनी कायम पुढे केली आहे. त्यामुळे हीच रचना पुढच्या काळात कायम राहिल अशी व्यवस्था राष्ट्रवादी पक्षाकडून केली जात आहे. 


...अन् भाकरी फिरवलीच!


शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षांची जबाबदारी चांगल्या नेत्याकडे जाईल, असं एकंदरीत राजकारणात दिसत होतं. त्यावेळी सुप्रिया सुळे यांचं नाव प्रफुल्ल पटेलांच्या नावापेक्षा जास्त चर्चेत होतं. मात्र त्यानंतर कार्यकर्त्यांच्या दबावामुळे शरद पवारांनी निर्णय मागे घेतला. त्यानंतर त्यांनी आज थेट भाकरी फिरवण्याचा निर्णय अंमलात आणला आहे.


राष्ट्रवादीच्या कामाची विभागणी कशी आहे?


राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काही प्रमाणात मतभेद आहेत. शिवाय प्रत्येक पक्षात अशा प्रकारचे मतभेद कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये असतात. त्यामुळे या निर्णयामुळे राष्ट्रवादीतून काही प्रमाणात वेगळ्या प्रतिक्रिया उमटू शकतात. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय स्तरावर राजकारण करावं आणि अजित पवार यांनी महाराष्ट्रातलं राजकारण करावं, अशी राष्ट्रवादीच्या कामाची विभागणी करण्यात आली आहे. याच पद्धतीने येत्या काळात राष्ट्रवादी राजकारण करणार आहे, अशी खात्री अजित पवार आणि बाकी नेत्यांना मिळाली तर या निर्णयाचे  कोणत्याही प्रकारचे पडसाद  उमटणार नाहीत, असं देशपांडे यांनी स्पष्ट केलं. 


शरद पवारांचा शब्द 'अंतिम'



राष्ट्रवादी पक्षात शरद पवारांचा शब्द अंतिम मानणाऱ्या नेत्यांची मोठी फळी आहे. अजित पवार यांच्याकडे नेतृत्व दिलं असतं तर पक्षाच्या काही नेत्यांकडून विरोधात्मक प्रतिक्रिया येण्याची शक्यता असती. मात्र राष्ट्रवादीचे अनेक नेते जर शरद पवारांच्या या निर्णयाशी सहमत असतील तर त्यांच्या या निर्णयाला फार विरोध होणार नाही, असं देशपांडे म्हणाले.