पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपच्या दोन आमदार समर्थक नगरसेवकांमध्ये आज वाद पेटला. स्थायी समितीच्या बैठकीत हा अभूतपूर्व गोंधळ झाला. भोसरीचे आमदार महेश लांडगे समर्थक अध्यक्ष यांना चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप समर्थक सदस्यांनी घेरलं. बनावट कागदपत्रे घेऊन अनेक ठेकेदारांनी ठेके घेतले. याचा खुलासा आयुक्तांनी करावा अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांनी केलं. पण स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनी ही भाजपच्याच सदस्यांच्या मागणीला थारा दिला नाही. यावरून हा अभूतपूर्व गोंधळ झाला.


काही ठेकेदारांनी बनावट कागदपत्रे वापरून महापालिकेकडून कामं मिळविल्याचं समोर आलंय. तर अन्य 100 ठेकेदारांनी चालू वर्षात असा कारनामा करत शेकडो कोटींची काम मिळवली आहेत. हे ठेकेदार कोण? कोणाच्या सांगण्यावरून हा प्रताप सुरुये? आणि कोणत्या अधिकाऱ्यांची याला साथ आहे? याचा खुलासा आयुक्तांनी करावा आणि तसे आदेश अध्यक्ष लोंढे यांनी द्यावेत, अशी मागणी करत भाजपच्या जगताप समर्थकांनी भाजपच्याच अध्यक्षांना घेराव घातला. तरी ही अध्यक्ष लोंढे यांनी आयुक्तांना खुलासा करण्याचे आदेश दिले नाहीत. मग नंतर फाईली भिरकवण्यात आल्या. तसेच माईकसह काही वस्तूंची तोडफोड झाल्याची ही चर्चा आहे. हे घडत असतानाच सभागृहाचे दार उघडून अध्यक्ष लोंढे यांनी भाजपच्या सदस्यांना बाहेर हकलले असा आरोप आमदार जगताप समर्थक सदस्य अंबरनाथ कांबळे यांनी केला.


अध्यक्ष आम्हाला बाहेर काढून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्याने इतर विषय मंजूर करणार असल्याचे ही कांबळेंनी नमूद केलं. राज्यात महाआघाडीची सत्ता आहे आणि अशात भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचे समर्थक असणारे अध्यक्ष लोंढे यांनी अशी भूमिका घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. यावर अध्यक्ष लोंढे यांनी वाकडच्या मार्गावरून वाद झाल्याचं म्हटलं. काही सदस्यांची वर्तवणूक चुकीची होती असं ही ते म्हणाले. तर समोर आलेल्या व्हिडिओत अध्यक्ष लोंढे यांनी भाजपच्याच सदस्यांना फटकारले आणि मला जाब विचारू नये. मी माझ्या पक्षश्रेष्ठींकडे खुलासा करेन असं ही ठणकावले.


अध्यक्ष लोंढे यांनीं उल्लेख केलेला वाकडचा मार्ग हा शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्या प्रभागातील आहे. कलाटे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरुये, तो वाद अनेकदा उफाळून येतो. यातूनच वाकड मधील मार्गाचा प्रश्न अनेक महिन्यांपासून रखडलेला होता. याच मार्गावरून स्थायी समितीच्या बैठकीत यापूर्वी ही भाजपमध्ये वाद झाला होता. तो वाद स्थायी समितीच्या सभागृहापुरता मर्यादित होता, आज झालेल्या वादाने मात्र अख्खी महापालिकेत खळबळ उडाली. याचे पडसाद पुढे ही उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.