पुणे : पुण्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात आजी-माजी खासदारांच्या कलगीतुऱ्याने महाविकासआघाडीत बिघाडी होऊ शकते, हे समोर आणलं होतं. अशातच आणखी एक नवा अध्याय सुरु झालाय. खेड पंचायत समिती सभापतीच्या निवडीवरून आता शिवसेनेचे माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे आमदार एकमेकांसमोर उभे ठाकलेत. इथली महाआघाडी कधी सुरळीत नव्हतीच असं त्यांनी उघडपणे जाहीर केलंय.
पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी 27 मे ला खेड पंचायत समिती सदस्यांवर सभापतींनी हल्ला केला. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेने स्थानिक पातळीवरील महाविकासआघाडीतील बिघाडी पुन्हा चव्हाट्यावर आणली. खेडचे सभापती शिवसेनेचे भगवान पोखरकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झालाय. शिवसेनेचे सहा सदस्य 31 मे ला या ठरावाच्या बाजूनेच कौल देणार आहेत. त्यामुळं इथल्या महाविकासआघाडीत सुरळीपणा नव्हताच आणि याला राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, असा आरोप करत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निशाणा साधला. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंकडे माजी खासदारांनी मोठ्या चौकशीची मागणी करावी. या दुष्कृत्यात मी दोषी आढळलो तर शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण तथ्य न आढळल्यास आढळरावांनी तोंड काळं करूनच तालुक्यात फिरावं, असा पलटवार आमदार दिलीप मोहितेंनी केलाय.
खेड पंचायत समितीवर शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. इथं शिवसेना - आठ, राष्ट्रवादी काँग्रेस - चार, काँग्रेस - एक, भाजप - एक असे एकूण चौदा सदस्य आहेत. पैकी सेनेचे सहा हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी करण्याची चिन्ह आहेत. त्यामुळं 31 मे ला आढळरावांचे खंदे समर्थक भगवान पोखरकरांची सभापतीवरून उचलबांगडी होणार हे निश्चित आहे. पण या तापलेल्या राजकारणाने महाविकासआघाडीत स्थानिक पातळीवर कशी बिघाडी होऊ शकते. हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.