इंदापूर: आज महायुतीच्या मंत्रीमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीला काही मंत्र्यांनी आवर्जुन उपस्थिती लावली, काहींनी तर आज बैठकीच्या आधी आणि बैठकीच्या नंतर आपला पदभार स्वीकारला. तर काही मंत्री गैरहजर असल्याचं दिसून आलं. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि क्रीडा व अल्पसंख्यांक विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीला दांडी मारल्याचं दिसून आलं, त्यांच्या अनुपस्थितीने चर्चा रंगल्याचं दिसून आलं. मात्र, कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ तर घेतली असली तरी त्यांनी अद्याप क्रीडा विभागाचा पदभार घेण्यास विलंब केल्याचं चित्र आहे, तर त्यांनी आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहण्याचं कारण देखील सांगितलं आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येऊ न शकल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे. 


कार्यकर्त्याच्या प्रेमाखातर पहिल्याच कॅबिनेट बैठकीला दांडी


राज्य मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट आज पडली आहे. या कॅबिनेटला क्रीडा व अल्पसंख्यांक विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे मात्र अनुपस्थित राहिले आहेत. खातं वाटपावरून दत्तात्रय भरणे नाराज असल्याच्या चर्चा होत्या, यावर त्यांनी स्पष्टीकरण ही दिलं. मात्र आज पहिल्याच कॅबिनेटला भरणे यांनी दांडी मारल्याने राजकारणात पुन्हा भुवया उंचावल्या. अत्यंत जवळच्या कार्यकर्त्याच्या घरातील विवाह सोहळा आणि या कार्यकर्त्याला जपण्यासाठी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पहिल्याच कॅबिनेटला दांडी मारली असल्याचं सांगितलं आहे. कॅबिनेटचा निरोप आपल्याला रात्री उशिरा आला पुढील आठवड्यात मी खात्याचा पदभार स्वीकारणार आहे, त्यावेळी जाणारच आहे. कॅबिनेट जितकी महत्त्वाची तितकीच कार्यकर्ता देखील मला महत्त्वाचा असल्याचं भरणे यांनी म्हटलं आहे. तुम्ही चुकीच्या बातम्या चालवू नका सगळं काही व्यवस्थित आहे असे भरणे म्हणाले आहेत.


दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चांवर मंत्री भरणेंची प्रतिक्रिया


दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे. काल वर्षाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांच्या मातोश्रींनी विठ्ठलाकडे दोघांनी एकत्र यावं असं साकडं घातलं, त्याचबरोबर नरहरी झिरवळ यांनी देखील याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे, दरम्यान, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील अशा चर्चा असताना राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील यावरती प्रतिक्रिया दिली आहे. शंभर टक्के या दोन्ही घराण्यांनी एकत्र आलं पाहिजे, ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. पवार घराणं म्हणून आपल्या सर्वांचं दैवत आहे. या दोघांनी एकत्र येण्यातच सर्वांना आनंद आहे असं भरणे यांनी इंदापूरमध्ये म्हटलं आहे.


मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय खालीलप्रमाणे:


- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय (महसूल विभाग)


- शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी.


- राज्य सरकार 4 हजार 849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार, राज्यातील तब्बल 963 शेतकऱ्यांना होणार फायदा. महाराष्ट्रातील 963 शेतकऱ्यांच्या 4 हजार 949 जमिनी शासन जमा झाल्या होत्या. आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात निर्णय घेत संपूर्ण 963 शेतकऱ्यांच्या जमीनी त्यांच्या मालकीच्या होणार. रेडीरकनरच्या 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावे लागणार