पुणे: राज्यासह देशभरात चर्चेत आलेली ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर(IAS Pooja Khedkar) हिच्या दिव्यांग प्रमाणपत्रबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तिने खोटं प्रमाणपत्र सादर केलं असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पुजा खेडकर दोषी आढळल्यास तिच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाकडून करण्यात आली आहे. पुजा खेडकर हिने जर अंध असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केलं असेल तर तिने एका खऱ्या अंध व्यक्तीवर अन्याय केला आहे असं या संघटनेचे सदस्य असलेल्या अंध व्यक्तीने म्हटलं आहे. 


त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला किमान चाळीस टक्के दृष्टीदोष असेल तरच त्या व्यक्तीला दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र मिळते आणि अशी व्यक्ती कार चालवणं तर दूरच लिहू-वाचू देखील शकत नाही असं या अंध व्यक्तींच म्हणणं आहे. त्यामुळे पुजा खेडकरने प्रमाणात कसं मिळवलं असा प्रश्न या अंध व्यक्तीने उपस्थित केला आहे.


पूजा खेडकरला अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळालं दिव्यांग प्रमाणपत्र


वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर(IAS Pooja Khedkar) हिला अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.पूजा खेडकरला डोळे आणि मानसिक आजाराचे एकत्रित प्रमाणपत्र 2021 मध्ये दिल्याची माहिती आहे. तसेच तत्कालीन वैद्यकीय मंडळांना हे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती देण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्यात या नोंदी आढळल्या असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितले आहेत.


पूजा खेडकरचे(IAS Pooja Khedkar) वडील सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर हे भालगाव (ता. पाथर्डी) येथील रहिवासी आहेत. परंतु, गेल्या काही वर्षापासून ते पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी पूजा खेडकर ही दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झाली आहे. प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून तिची पुण्यात नियुक्ती झाली होती. खासगी वाहनावर लाल दिवा लावणे, भारत सरकार असा बोर्ड लावणे, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात हस्तांतरीत करणे, आदी नियमबाह्य वर्तन तिने केले होते त्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली होती.


खोट्या प्रमाणपत्राद्वारे तिने हे पद मिळवल्याचा होतोय दावा 


 लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत खोट्या प्रमाणपत्राद्वारे तिने हे पद मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे. दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करत पूजा खेडकर आयएएस झाली. त्यासाठी तिला सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलवले होते. परंतु सहा वेळा ती हजर राहिली नाही. त्याऐवजी बाहेरुन वैद्यकीय अहवाल दिला, त्यामुळे वाद निर्माण झाला होता.